
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) फाशीची शिक्षा रद्द व्हावी या याचिकेवर मी स्वाक्षरी केली होती. कुठल्याही आरोपीच्या समर्थनासाठी मी सही केली नव्हती. विशेष म्हणजे, त्या याचिकेवर उच्च व सर्वोच्च न्यायालयातील अनेक न्यायमूर्तींच्याही सह्या होत्या. इतकेच काय, भाजपचे माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचीही सही होती. तेव्हा भाजपवाले झोपले होते का?, भाजपने आधी शत्रुघ्न सिन्हांना जाऊन हे प्रश्न विचारावेत,’ अशा शब्दात काँग्रेसचे आमदार तथा मंत्री अस्लम शेख यांनी भाजपच्या टीकेला उत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये काँग्रेसचे मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांचाही समावेश आहे. अस्लम शेख यांनी २०१५ साली याकूब मेमनची फाशी रद्द करण्याची मागणी अधिवेशनात केली होती. तसेच, फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर त्यांनी स्वाक्षरी देखील केली होती. तोच मुद्दा लावून धरत भाजपने अस्लम शेख यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाचा निषेध केला होता. तसेच, सरकारवर टीका केली होती. त्यावर खुद्द अस्लम शेख यांनीच भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. ‘भाजपचा जन्म या देशाचा सत्यानाश करण्यासाठी झाला आहे. महात्मा गांधी यांना मारणारे आणि नथुराम गोडसेचे मंदिर बांधणारे हे लोक आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार?, आम्ही त्यांना योग्य उत्तर देत राहू,’ असा घणाघात शेख यांनी केला आहे.