मुंबई । सचिन वाझे प्रकरणावरून आक्रमक झालेल्या भाजपने आता पोलिसांवर हुकुमशाही ठाकरे सरकारचा दबाव असल्याचा आरोप केला आहे.
सचिन वाझे प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग यांच्यावर टीका केली जात होती. राज्य सरकारने त्यांच्या बदलीचे आदेश काढले. याचबरोबर आता भाजपाने ठाकरे सरकारवर टीका करणं सुरू केलं आहे.
“जगभर नावाजलेल्या महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर इतका दबाव कधीही आला नसेल. हुकूमशाही ठाकरे सरकारच्या दबावात त्यांना नको ती कामं करावी लागताहेत. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडण्याचं आणि अनेक प्रकरणं दाबण्याचं पाप या सरकारकडून केलं जातंय!” असं ट्विट भाजपाकडून करण्यात आलेलं आहे.
तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भाजपाने प्रश्नांची भडीमार केला आहे. “वाझेंची नेमणूक चालवून घेतलीत, आता त्यांना सॅल्यूटही ठोका हा आदेश मानणार नाही सांगितल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांची बदली झाली का? हिरेन यांच्याबाबत बातम्या आल्यानंतरही वाझेंवर काहीच कारवाई झाली नाही. NIA चौकशी सुरू होईपर्यंत वाझेंना सांभाळून घेण्याचे आदेशच होते का? इतके भयंकर कट रचणाऱ्याच्यांच हाती तपास… चोराच्या हातीच चाव्या देण्याइतके मजबूर का झालात गृहमंत्री? वाझेंना ज्या अदृश्य शक्तींनी संरक्षण दिलं होतं, त्यांच्याच इशाऱ्यावर ATS काम करतंय. गृहखातं तुमच्याकडे खरोखरच आहे की तुम्ही फक्त नामधारी? उत्तर द्याल अनिल देशमुख? असे प्रश्न भाजपाकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारण्यात आले आहेत.