धुळे प्रतिनिधी । काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पायपोस एकमेकांच्या पायात नाहीत. त्यामुळे ते आधीपासूनच पराजयाच्या मानसिकतेच गेले आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. धुळे ग्रामीणमधील नेर येथे ते महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलत होते.
पुढे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंधरा वर्षांत ज्या राज्यातला शेतकरी पूर्णपणे उद्धवस्त झाला होता, अशा महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहिलो. पंधरा वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने शेतकऱ्यांना २० हजार कोटीची मदत केली. मात्र, पाच वर्षात युतीच्या सरकारने केलेली मदत ही ५० हजार कोटींची होती. आम्ही राज्यात ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली ती अजूनही सुरुच आहे. प्रत्येक शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात शेतकऱ्याला वर्षाला बाराशे कोटी रुपये दिले जात होते आम्ही १० हजार कोटी रुपये दिले. जलयुक्तशिवार योजनेतून जवळजवळ १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना शेततळी दिली, दीड लाख शेतकऱ्यांना विहीरी दिल्या. कालपरवा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जाहिरनाम्यात त्यांनी जगातली सर्व आश्वासने देऊन टाकली फक्त प्रत्येकाला ताजमहाल बांधून देण्याचे आश्वासनं देणं बाकी राहिलंय. कारण आश्वासनं पूर्ण करायची नाहीत हे त्यांचे धोरण आहे. पन्नास वर्षे खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारचं राजकारण यांनी केलं. जनतेचा नव्हे तर स्वतःचा फायदा करुन घेतला. गेल्या पाच वर्षात हे केंद्रातील आणि राज्यातील सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप लावू शकले नाहीत. आम्ही चोवीस तास जनतेकरीता काम केलं. असे ही यावेळी म्हणाले.