जळगाव प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित फायदेशीर किंमत तथा लाभकारी मूल्यासाठी भारतीय किसान संघाच्या वतीने आज बुधवारी ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जळगाव शाखेच्या भारतीय किसान संघातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले असून विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना सादर करण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सद्यस्थितीत शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची योग्य किंमत न मिळाल्यामुळे गरीब शेतकरी आणखी गरीब आणि कर्जबाजारी होत चालला आहे, सरकार आपल्या परीने शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करते परंतु क्षणिक सांत्वनामुळे शेतकऱ्यांची परिस्थिति सुधारणे अशक्य आहे. उत्पादनखर्च आणि त्यावर ठराविक लाभ देणे सरकारने सुरू करावे एवढीच त्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे अन्यथा बेरोजगारीच्या या वातावरणात शेतकरी एकटा नाही तर परिवारासमवेत आत्महत्या करण्यास प्रवृत्त होईल.
शेतकऱ्यांना किमान आधारभूत रक्कम नाही तर ‘उत्पादन खर्चावर आधारित फायदेशीर किंमत’ द्यावी, एकदा घोषित केलेल्या फायदेशीर किमतीत(लाभकारी मूल्य) वेळोवेळी महागाईनुसार समायोजन करून त्या प्रमाणात शेतमालाला भाव मिळालाच पाहिजे. शेतमालाला ‘उत्पादन खर्चावर आधारित फायदेशीर किंमती’साठी कायदा करावा, अन्यथा भारतीय किसान संघ प्रायव्हेट मेंबर बिलच्या माध्यमातून संसदेत कायदा बनविण्याची प्रक्रिया सुरू करेल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
या धरणे आंदोलनात जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.आंदोलक शेतकऱ्यांना भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.मनोहर बडगुजर, महामंत्री वैभव महाजन, प्रांत कार्यकारणी सदस्या कपिलाताई मुठे, जिल्हा जैविक शेती प्रमुख डॅा.दीपक पाटील यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रा.मनोहर बडगुजर, उपाध्यक्ष शिवराम महाले, कपिला मुठे, डॉ. दिपक पाटील, वैभव महाजन, रवींद्र पाटील, प्रभाकर पाटील, रतिलाल कोळी, सतिष पाटील, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पत्रकार श्रीकांत नेवे, भगवान न्हायदे, अमोल पाटील, प्रेमचंद भारंबे, अनुप पाटील, प्रतिक पाटील, मयूर पाटील, स्वप्नील पाटील, प्रमोद महाजन, श्रीकांत श्रीखंडे, अॅड.दिपक शिंदे उपस्थित होते.