जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्याच्या वनविभागाअंतर्गत ३ वन कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेशानुसार १९९८ पासून कायमस्वरूपी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे वेतन लागू करावे व फरकाची रक्कम अदा करावी या मागणीसाठी जळगाव शहरातील जीएस मैदानात लाभांपासून वंचित असलेल्या तिघे वनकर्मचाऱ्यांनी बुधवारी १४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेपासून धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे.
प्रसिद्धीपत्रकात दिलेले माहिती अशी की एरंडोल तालुक्यातील नाना सुरसिंग पाटील रामचंद्र दत्तू कोळी आणि शांताराम त्रंबक अपार हे तीन कर्मचारी १९८८ पासून वनविभागात वनकर्मचारी म्हणून काम करीत आहे. दरम्यान काम करत असताना सलग ५ वर्षे काम करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना कायम तत्त्वावर घेण्याचे आदेश दिल्यानंतर जळगाव जिल्ह्यात व इतरत्र सामाजिक वनीकरण खात्यामध्ये अनेक रोजंदारी वन कामगार यांना कायम करण्यात आले आहे. परंतु नाना पाटील, रामचंद्र कोळी आणि शांताराम अपार या तीन वन कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अद्यापपर्यंत संबंधित विभागाकडून कायमस्वरूपी कामावर घेण्यासंदर्भात कोणत्याही कार्यवाही केलेली नाही. दरम्यान उर्वरित ३ कर्मचाऱ्यांना देखील कायमस्वरूपी कामावर घ्यावे, तसेच फरकाची रक्कम तातडीने अदा करावी आणि सेवानिवृत्तीपर्यंत इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन लागू करण्यात यावे, या मागणीसाठी वन कर्मचारी नाना पाटील, रामचंद्र कोळी आणि शांताराम अपार यांनी जी.एस. ग्राउंड येथील मैदानात प्रलंबित मागण्यासाठी धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहील असा देखील त्यांनी पवित्रा घेतला आहे.