धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी| धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी काल, बुधवार, २३ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास वाळूमाफियांना पकडण्यासाठी थेट नदीपात्रात उडी घेतल्याचा थरारक प्रकार घडला आहे. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक आटोपून धरणगावकडे परतत असताना बांभोरी पुलावरून त्यांना नदीपात्रात काही वाळू माफिया वाळूची चोरी करत असल्याचे निदर्शनास आले.

तात्काळ त्यांनी आपले वाहन थांबवले आणि क्षणाचाही विलंब न लावता नदीपात्रात उतरले. नदीत पाणी जास्त असूनही, सूर्यवंशी यांनी जीवाची पर्वा न करता थेट पाण्यात उडी घेऊन पोहत दुसऱ्या किनाऱ्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. तहसीलदारांना आपल्या दिशेने येताना पाहताच वाळू उपसा करणाऱ्या माफियांनी लागलीच वाळू काढण्याचे काम थांबवले आणि तेथून पळ काढला. तहसीलदार सूर्यवंशी यांनीही त्यांचा पाठलाग केला.
तहसीलदारांच्या या धाडसी कारवाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका जबाबदार अधिकाऱ्याने दाखवलेल्या या धैर्याचे आणि कर्तव्यनिष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या घटनेमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये धडकी भरली असून, प्रशासनाची यापुढे कोणतीही गय केली जाणार नाही, असा संदेश यातून गेला आहे.



