धरणगाव प्रतिनिधी । येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे विद्येची खरी देवता सवित्रीमाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेतील शिक्षकवृंदाना सावित्रीबाईंचा जन्मोत्सव ही पुस्तिका भेट स्वरूप देण्यात आली.
जी.एस.ए. स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांनी माईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. समाजाच्या प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारून जनसामान्यांच्या पर्यंत शिक्षणाची गंगा पोहचविण्यासाठी फुले दाम्पत्यांनी अथक परिश्रम घेतले. १ जानेवारी १८४८ ला पुण्यातील भिडेंच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढून त्यांनी स्त्रीमुक्तीचे दार खुले केले.
पहिल्या स्त्री शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका, समाजसुधारक, साहित्यिक, विचारवंत, कुशल प्रशासक अशा शब्दांत माईंच्या कार्याच्या विविध पैलूंवर शाळेतील शिक्षक लक्ष्मण पाटील यांनी प्रकाश टाकला. याप्रसंगी ४५ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तृतीय क्रमांक संपादन केलेल्या विद्यार्थी व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आजच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेतील शिक्षकवृंदाना दर्शना पवार लिखित सावित्रीबाईंचा जन्मोत्सव ही पुस्तिका भेट स्वरूप देऊन माईंच्या कार्याचा प्रसार करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.