जळगाव प्रतिनिधी । कापूस विक्रीचे पैसे गडप करण्यासाठी पुतण्याने लूट झाल्याचा बनाव केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, बांभोरी (ता. धरणगाव) येथील रहिवासी भगवान हरी पाटील (वय ४२, रा. बांभोरी) यांनी काही दिवसांपूर्वी ४ लाख ९८ हजार रुपयांचा कापूस पुतण्या भारत छगन पाटील (रा. बांभोरी) याच्या वडिलांच्या नावाने विकला होता. मात्र हे पैसे परत न देता स्वत: हडप करण्यासाठी त्याने लूट झाल्याचा बनाव केला.
८ रोजी भारत याने धरणगावच्या जेडीसीसी बँकेतून कापसाचे पेमेंट असलेले ४ लाख ९८ हजार रुपये काढले. मात्र रस्त्यात या पैशांची लूट झाल्याचा बनाव त्याने केला. तसेच त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. यातून पुतण्याने आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच भगवान पाटील यांनी धरणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित पुतण्या भारत पाटील याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील पोलिस नाईक विलास सोनवणे तपास करीत आहेत.