धरणगाव (प्रतिनिधी) येथील पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी बँड पथकाची गाडी पकडल्यानंतर मोरे यांच्या मनमानी वर्तणुकीविरुध्द येथील शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज सायंकाळी पोलीस ठाण्यात अकस्मात ठिय्या आंदोलन केले. यावेळी मोरे यांच्याविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर शिवसेना नेते व राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी मध्यस्थी करून पो.नि. मोरे यांना समज दिली. त्यानंतर मोरे यांनी आंदोलकांची माफी मागून पकडलेले वाहनही सोडून दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
अधिक माहिती अशी की, आज दुपारी बँड पथकाची एक गाडी शहरातून ग्रामीण भागाकडे लग्नात बँड वाजवण्यासाठी जात असताना पोलीस निरीक्षक मोरे यांनी ती गाडी पकडून पो.स्टे.ला जमा केली. त्यानंतर शहरातील शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांना या प्रकारची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ व भाजपचे तालुका प्रमुख संजय महाजन यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी सदर वाहन मुक्त करण्यासाठी हे ठिय्या आंदोलन केले. पो.नि. मोरे हे मनमानी कारभार करीत असून गोर-गरिबांवर अन्याय करीत असल्याचा आरोप यावेळी या पदाधिकाऱ्यांनी केला. पोलीस खात्यातील कुणी वरिष्ठ अधिकाऱ्याने येवून कारवाईचे आश्वासन द्यावे व मोरे यांची त्वरित बदली करण्यात यावी, अशा मागण्या या आंदोलकांनी मांडल्या. बराचवेळ पो.स्टे. परिसरात तणावाचे वातावरण होते. त्यानंतर शिवसेना नेते व राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे तेथे आगमन झाले. त्यांनी सगळा विषय जाणून पो.नि. मोरे यांना समज दिली. त्यानंतर मोरे यांनी संतप्त आंदोलकांची माफी मागून पकडलेले बँड पथकाचे वाहन सोडून दिल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.