जळगाव प्रतिनिधी । शेतीसाठी विकासोसह खाजगी कर्ज घेतले, मात्र परतफेड न झाल्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून जळगाव तालुक्यातील धानवड येथील युवराज महादू चव्हाण (वय-42) या शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी 2 वाजता उघडकीस आली.
याबाबत माहिती अशी की, युवराज चव्हाण यांच्याकडे साडे तीन एकर शेती आहे. दरवर्षी दुष्काळामुळे शेतातून उत्पन्नच येत नाही, तर दुसरीकडे कर्जाचा डोंगर वाढतच चालला होता. त्यामुळे चव्हाण गेल्या आठ दिवसापासून तणावात होते. सोमवारी सकाळी ते नेहमी प्रमाणे शेतात कामाला गेले. दुपारी घरी का आले नाही म्हणून कुटुंबातील सदस्य शेतात बोलवायला गेले असता चव्हाण यांनी झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवसनेचे उपजिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, भाजपा युवा मार्चाचे सरचिटणीस भाऊसाहेब पाटील व पोलीस पाटील रवींद्र आवारे यांनी घटनास्थळ गाठले. तेथून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. चव्हाण यांच्या पश्चात पत्नी आशाबाई, मुलगा पवन, नरेश व मुलगी सविता असा परिवार आहे.