भडगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जवळ येताच भडगाव तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच वडजी गणातील पिचर्डे गावचे रहिवासी आणि भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते धनराज पाटील यांनी आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी वडजी गणातून उमेदवारीची मागणी करत पक्षाकडे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

धनराज पाटील यांनी आपल्या उमेदवारीची मागणी थेट भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मांडली असून, या मागणीमागे त्यांची दशकभराची निष्ठावान सेवा, राजकीय अनुभव आणि सामाजिक योगदान आहे. पत्रकार म्हणून ते भडगाव तालुक्यात परिचित आहेतच, पण त्यांच्या सामाजिक कार्यामुळेही त्यांना व्यापक जनसंपर्क लाभलेला आहे. 2010 पासून त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काम करताना चार वर्षे सक्रिय सहभाग घेतला होता. त्यानंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश करत त्यांनी पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्या.

युवा मोर्च्याचे शाखाध्यक्ष, बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, गण प्रमुख, गट प्रमुख अशा विविध पदांवर काम करत त्यांनी पक्ष संघटनेची मजबूत पायाभरणी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो वा लोकसभा-विधानसभा रणधुमाळी, प्रत्येक निवडणुकीत त्यांनी पक्षासाठी निष्ठेने भूमिका बजावली आहे. स्वतःच्या इच्छेपेक्षा पक्षाच्या आदेशाला नेहमीच प्राधान्य दिले, हे त्यांच्या कार्यशैलीतून स्पष्ट दिसते.
धनराज पाटील हे उच्चशिक्षित, अभ्यासू, साधा आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व म्हणून वडजी गणात ओळखले जातात. त्यांच्या पारदर्शक कार्यपद्धतीमुळे त्यांना नातेवाईक, मित्रपरिवारासह सामान्य जनतेतही चांगला पाठिंबा आहे. पत्रकारिता क्षेत्रातही त्यांनी भडगाव तालुक्याच्या समस्या व प्रश्न मांडताना ठाम भूमिका घेतली आहे. त्याशिवाय ‘निसर्गमित्र समिती’चे भडगाव तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी पर्यावरण विषयक कामांमध्येही मोलाचे योगदान दिले आहे.
पक्षाने वेळोवेळी उमेदवारीसंदर्भात शब्द दिला, मात्र पक्षनिष्ठेच्या भावनेतून पाटील यांनी मागे राहून इतर उमेदवारांसाठी कार्य केले. यावेळी मात्र कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचा त्यांचा निर्धार आहे. तरीही शेवटी पक्षाचा आदेशच अंतिम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपचे ज्येष्ठ नेते नामदार गिरीश महाजन, खासदार स्मिताताई वाघ, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार दिलीप वाघ, युवा नेते अमोल शिंदे, वैशालीताई सुर्यवंशी आणि जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखालीच निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.
धनराज पाटील यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाल्यास, पक्षात निष्ठेचे आणि मेहनतीचे मूल्य जपले जात असल्याचा संदेश कार्यकर्त्यांमध्ये जाईल, असा जनतेतून सूर उमटत आहे.



