भडगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी शिक्षक संघटनेच्या भडगाव तालुका अध्यक्षपदी धनराज पाटील पिचर्डे यांची निवड करण्यात आली आहे. आज भडगाव येथे सर्व युवा प्रशिक्षणार्थी शिक्षक आणि शिक्षिका यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. या बैठकीत उपाध्यक्षपदी ज्योत्स्ना पाटील, सचिवपदी गणेश पाटील, कार्याध्यक्ष म्हणून पूजा कुमावत, संघटकपदी श्रुती पाटील, प्रसिद्धी प्रमुख म्हणून विजया महाजन, तर सल्लागार म्हणून माधुरी देसले मॅडम यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी प्रशिक्षणार्थी शिक्षकांना येणाऱ्या अडचणी व समस्या सोडवण्यासाठी खंबीरपणे प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. शासनाने सुरुवातीला या प्रशिक्षणाचा कार्यकाळ सहा महिने निश्चित केला होता, परंतु नुकत्याच झालेल्या अधिवेशनात त्यात आणखी पाच महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. कार्यकाळ वाढवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे आश्वासनही पदाधिकाऱ्यांनी दिले.
भडगाव तालुका अध्यक्षपदी निवड झालेले धनराज पाटील हे पिचर्डे गावचे रहिवासी असून, ते पत्रकार म्हणूनही कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि निसर्ग मित्र समितीचे जळगाव जिल्हा सरचिटणीस म्हणूनही काम केले आहे. त्यांना सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रात काम करण्याचा मोठा अनुभव आहे, ज्याचा फायदा संघटनेला निश्चितच होईल, असे मत उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केले.
धनराज पाटील यांच्या निवडीबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचे आणि सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. सर्वांनी एकजुटीने काम करून प्रशिक्षणार्थी शिक्षकांच्या हितासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.