धरणगाव, प्रतिनिधी | “शहरात राष्ट्रवादी काँग्रेससाठी अनुकूल वातावरण आहे, लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश भागवत चौधरी यांच्याबद्दल नागरिकांचे मत चांगले आहे. मी वेळोवेळी शहरातील लोकांशी बोलत असतो, त्यातून मला हे जाणवले आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजीमंत्री गुलाबराव देवकर यांनी आज (दि.२१) येथे व्यक्त केले. ते निलेश चौधरी यांच्या प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, “शहरात पाणीपुरवठ्याची समस्या मोठी आहे. गेल्या १५-२० वर्षात हा प्रश्न सुटू शकलेला नाही. याउलट मी मंत्री असताना येथे उड्डाणपूल, मुख्य रस्ता व अन्य विकास कामे केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा काम करणारा पक्ष आहे, असा लोकांना विश्वास आहे.”
प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी शहरातील बालाजी महाराज मंदिराजवळ उमेदवार निलेश चौधरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, कार्याध्यक्ष विलास पाटील, उपजिल्हाध्यक्ष दीपक वाघमारे, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, मोहन पाटील, देवरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.