भोवळ आल्याने धनंजय मुंडे रूग्णालयात : अजित पवार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना भोवळ आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना काल रात्री उशीरा ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले. अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल केले असून त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती समाजमाध्यमांमध्ये पसरली होती. मात्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याबाबत आज अधिकृत माहिती दिली.

उपमुख्यमंत्री म्हणाले की, ’धनंजय मुंडे यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची बातमी चुकीची आहे, त्यांना भोवळ आली होती. त् यांना दोन ते तीन दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहेत. एमआयआरसह इतर तपासण्या करण्यात येत आहेत. मुंडे हे काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत पक्ष कार्यालयात होते. तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या कुटुंब त्यांच्यासोबत असून घाबरण्याचं कोणतंही कारण नाही,’ असंही अजितदादा पवार यांनी म्हटलं आहे.

 

Protected Content