Home धर्म-समाज धनंजय चौधरी यांचा नर्मदा परिक्रमेत सहभाग

धनंजय चौधरी यांचा नर्मदा परिक्रमेत सहभाग


फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विश्वशांती व विश्वकल्याणाच्या उदात्त संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या माँ नर्मदा परिक्रमा पदयात्रेत फैजपूर परिसरातील धनंजय चौधरी यांनी सहभाग नोंदवत एक अनोखा आध्यात्मिक अनुभव घेतला आहे. श्री वृंदावन धामचे गादीपती व परिसरातील अत्यंत पूज्य संत श्री गोपाळ चैतन्यजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली ही पवित्र नर्मदा परिक्रमा पायी स्वरूपात सुरू असून, भक्ती, साधना आणि शिस्तीचे दर्शन या यात्रेत घडत आहे.

गुरुजी नर्मदा परिक्रमा करीत असल्याचे समजल्यापासूनच त्यांच्या सान्निध्यात किमान एक दिवस तरी चालण्याची तीव्र ओढ मनात निर्माण झाल्याचे धनंजय चौधरी यांनी सांगितले. आज तोच शुभ योग जुळून आल्याने या पवित्र पदयात्रेत सहभागी होण्याचा सुअवसर लाभल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मध्य प्रदेशातील खुठला ते करोली या मार्गावर त्यांनी श्री गोपाळ चैतन्यजी महाराज यांच्यासोबत पायी चालत या यात्रेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

या पदयात्रेदरम्यान पदयात्री ज्या भावनेतून मार्गक्रमण करीत होते, ते दृश्य अत्यंत प्रेरणादायी ठरत होते. हरिनामाचा अखंड जयघोष, भक्तिभावाने नाचत-गात पुढे सरकणारी पावले, आणि दररोज तीस किलोमीटरहून अधिक अंतर चालूनही चेहऱ्यावर थकव्याचा लवलेश नसणे, हे या यात्रेचे वैशिष्ट्य ठरले. कुठलाही दुःखभाव, चिंता किंवा क्षणभरही सांसारिक विचार न ठेवता सर्व पदयात्री परमेश्वराच्या भक्तीत पूर्णतः तल्लीन झाल्याचे दिसून येत होते.

हिंदू संस्कृतीत अत्यंत पवित्र मानली जाणारी नर्मदा नदी आणि तिच्या परिक्रमेला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. या यात्रेचा भाग होण्याचा अनुभव अत्यंत ऊर्जादायी, समाधान देणारा आणि अंतर्मुख करणारा ठरल्याचे धनंजय चौधरी यांनी सांगितले. निसर्गाच्या सान्निध्यात, संतांच्या मार्गदर्शनाखाली आणि सामूहिक भक्तीच्या वातावरणात चाललेली ही पदयात्रा आत्मिक समाधान देणारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या पवित्र यात्रेत सहभागी सर्व पदयात्री तसेच गुरुजी श्री गोपाळ चैतन्यजी महाराज यांना त्यांनी मनःपूर्वक नमन केले. आज अनुभवलेली आध्यात्मिक ऊर्जा, शिस्त आणि सामूहिक भक्ती दीर्घकाळ स्मरणात राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.


Protected Content

Play sound