बाळासाहेबांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी निवडून देण्याचा मान्यवरांचा निर्धार
यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भोरगाव लेवा पंचायतीचे दिवंगत कुटुंबनायक कै. रमेशदादा विठू पाटील यांच्या प्रतिमेला वंदन करून महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय चौधरी यांनी निवडणुकीसाठी आशीर्वाद घेतले. तर समाजासाठी स्व. बाळासाहेब चौधरी यांनी केलेल्या कामगिरीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी धनंजयला निवडून आणण्याची ग्वाही मान्यवरांनी याप्रसंगी दिली.
लेवा पाटीदार समाजाची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंब नायक रमेशदादा पाटील यांचे अलीकडेच निधन झाले असून या माध्यमातून समाजातील महनीय व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. दरम्यान, रावेर मतदारसंघातील काँग्रेसच्या तिकिटावर उभे असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार यांनी पंचायतीच्या मुख्य कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला वंदन करून आगामी निवडणुकीत यश मिळावे अशी प्रार्थना केली. याप्रसंगी त्यांनी नूतन कुटुंबनायक ललीतदादा पाटील यांचे आशीर्वाद देखील घेतले. त्यांच्या सोबत लेवा पाटीदार समाजातील मान्यवरांची उपस्थिती होती.
लेवा पाटीदार समाजाच्या आजवरच्या वाटचालीत चौधरी कुटुंबाची मोठी भूमिका राहिलेली आहे. यात प्रामुख्याने बाळासाहेब चौधरी यांनी समाजाला ओबीसीचे आरक्षण मिळवून दिल्यामुळे समाजात शैक्षणीक क्रांती झाली. यातून समाजातील तरूण साता-समुद्रापार जाऊन लेवा पाटीदार हा अत्यंत प्रगतीशील असा समाज म्हणून ओळखला जाऊ लागला. या ऋणातून उतराई होण्यासाठी आम्ही धनंजय चौधरी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून धनंजय चौधरी यांना निवडून आणू अशी ग्वाही याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी दिली.