Home Cities रावेर धनाजी नाना विद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहात

धनाजी नाना विद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहात

0
181


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूरच्या राज्यशास्त्र विभागातर्फे पाल (ता. साक्री) येथे शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना ग्रामीण व आदिवासी जीवन, कृषी विकास आणि पर्यावरणीय समज वाढवण्याच्या उद्देशाने दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी ही सहल पार पडली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. आर. वाघुळदे यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ताराचंद सावसाकडे, प्रा. मंजिरी पवार आणि प्रा. पल्लवी तायडे यांच्या संयोजनातून या सहलीचे नियोजन करण्यात आले.

या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी पाल येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन तेथे राबवण्यात येणाऱ्या विविध प्रयोगशील कृषी उपक्रमांची माहिती घेतली. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. महेश महाजन यांनी मशरूम उत्पादनाच्या प्रक्रियेपासून सुरुवात करून मधमाशी पालन, तेजपान, वेलदोडे, दालचीनी, लवंग अशा मसाल्याच्या पिकांची लागवड, सफरचंदाच्या विविध प्रजाती, भाजीपाल्याच्या रोपवाटिका, सेंद्रिय खतनिर्मिती, गांडूळखत प्रक्रिया, फुलशेती, तसेच विविध बांबू प्रजातींची माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रकल्पांना भेट देत कृषी नवकल्पनांचा अनुभव घेतला.

सहलीचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे पाल भागातील आदिवासी समाजाचे प्रत्यक्ष निरीक्षण. विद्यार्थ्यांनी आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, जीवनशैली तसेच त्यांना भेडसावणाऱ्या आरोग्य, सामाजिक व शैक्षणिक समस्यांची माहिती घेतली. डोंगराळ भागात राहणाऱ्या या समाजाच्या दैनंदिन जीवनाशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद झाला. आरोग्यविषयक जागरुकतेच्या अभावामुळे उद्भवणाऱ्या समस्यांविषयी त्यांनी जाणून घेतले आणि त्या संदर्भात विचारमंथन केले.

या सहलीत एक विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांचा तंत्रज्ञानापासून दूर राहण्याचा निर्णय. निसर्गाच्या सानिध्यात, शहराच्या गोंगाटापासून दूर विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर न करता प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षण घेण्यावर भर दिला. पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष पाहणी, संवाद आणि निरीक्षणाच्या माध्यमातून शाश्वत विकासाच्या संकल्पना त्यांनी समजून घेतल्या.


Protected Content

Play sound