Home Cities यावल धनाजी नाना महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

धनाजी नाना महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन


फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय युवादिनाच्या निमित्ताने धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय सण उत्सव समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात युवकांच्या हस्ते थोर विभूतींच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत त्यांच्या कार्याला मानवंदना दिली. राष्ट्रनिर्मितीमध्ये मातृशक्ती आणि युवाशक्तीचे महत्त्व अधोरेखित करणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. उपस्थितांनी दोन्ही महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

याप्रसंगी डॉ. मारोती जाधव यांनी राजमाता जिजाऊ यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घडणीत असलेले योगदान तसेच स्वामी विवेकानंद यांचे युवकांसाठीचे विचार सविस्तरपणे मांडले. आत्मविश्वास, चारित्र्य आणि राष्ट्रसेवेचा संदेश देणारे विवेकानंदांचे विचार आजच्या युवकांसाठी किती महत्त्वाचे आहेत, यावर त्यांनी प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन राष्ट्रीय सण उत्सव समितीचे चेअरमन डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी केले. त्यांनी महाविद्यालयीन जीवनात अशा प्रेरणादायी कार्यक्रमांचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना सामाजिक व राष्ट्रीय जबाबदारीची जाणीव करून दिली.

या कार्यक्रमासाठी तापी परिसर विद्या मंडळ फैजपूरचे सदस्य तथा माजी प्राचार्य डॉ. जी. पी. पाटील, माजी प्राचार्य आर. बी. वाघुळदे, उपप्राचार्य डॉ. मनोहर सुरवाडे, डॉ. कल्पना पाटील, डॉ. एच. जी. नेमाडे, राष्ट्रीय सण उत्सव समितीचे सदस्य, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन राष्ट्रीय युवादिनाचा उत्सव साजरा केला.


Protected Content

Play sound