जळगाव प्रतिनिधी । शहरातील हरिविठ्ठल नगरातील मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली होती. दरम्यान, पत्नीने केलेल्या मारहाणीतच मृत्यू झाल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी करत इनकॅमेरा शवविच्छेदनाची मागणी केली. त्यानुसार मृतदेह धुळे येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील हरिविठ्ठल नगरातील सुरेश भास्कर वाडे (वय-43) यांचा मृत्यू झाल्याची घटना आज (रविवार) सकाळी 7.45 वाजेच्या सुमारास घडली. सुरेश वाडे यांचे पत्नीसोबत नेहमी भांडण व्हायचे. या भांडणात हातात जी वस्तू येईल त्या वस्तूने मारहाण करायची, त्यामुळे भांडणातून झालेल्या मारहाणीतच सुरेश वाडे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मृत्यूचे कारण समोर यावे म्हणून नातेवाईकांनी इनकॅमेरा शवविच्छेदनाची मागणी केली. त्यानुसार मृतदेह धुळे येथे हलविण्यात आला.
हरिविठ्ठल नगरातील तडवी गल्लीत सुरेश वाडे, पत्नी अंजली, शुभम व शुभांगी अशी दोन मुले या कुटुंबियांसोबत वास्तव्यास होते. हातमजुरी करुन ते उदरनिर्वाह भागवित होते. 2005 मध्ये त्याचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झालेला आहे. तर अंजली हिचाही घटस्फोट झाला आहे. दोघेही प्रेमप्रकरणातून एकत्र आले होते. दोघं जण लग्न न करताच एकत्र राहत होते, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. रविवारी सुरेश वाडे यांची अचानक तब्येत बिघडली व ते जमीनीवर कोसळले. बेशुध्दावस्थेतील वडीलांना बघून शुभांगी याच परिसरात राहणार्या तिच्या काकाकडे गेली. याठिकाणी तिने चुलत भाऊ अजय विनोद वाडे वडीलांबाबत माहिती दिली. त्यानुसार अजय धावतच घरी पोहचला. यावेळी त्याचे काका ताडे घरातच बेशुध्दावस्थेत पडलेले होते. त्याने तत्काळ इतरांच्या मदतीने त्याला जिल्हा रुग्णालयात हलविले. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्यांनी सुरेश वाडे यांना मृत घोषित केले.
घटस्फोटीत अंजली हिला प्रेमसंबंधांतून घरात आणले होते. लग्न न करतातच दोघेही एकत्र रहायला लागले. त्यांना दोन मुले झाले. यादरम्यान काळात अंजली व सुरेश या दोघा पत्नीमध्ये नेहमी भांडणे व्हायचे. या भांडणातून अंजली पती सुरेश यांना मारहाण करायची. भांडणातून अंजलीने केलेल्या मारहाणीतून सुरेश ताडे यांचा मृत्यू झालाचा आरोप अजय वाडे, विनोद वाडे यांच्यासह नातेवाईकांनी केला आहे. त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठत पोलीस निरिक्षकांची भेट घेवून इनकॅमेरा शवविच्छेदनाची मागणी केली. त्यानंतर कर्मचारी संभाजी पाटील, ललीत भदाणे यांची जिल्हा रुग्णालयात पोहचले. नातेवाईकांच्या मागणीनुसार मृतेदह धुळे हलविण्यासाठी आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया पार पाडली. वाडे याच्या डोळ्याजवळ सुज असून अंगावर इतरही मारहाणीच्या जखमा असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. जिल्हा रुग्णालयात महिलांसह नातेवाईकांनी गर्दी केली. दुपारी 2 वाजेच्या सुमारास वाडे याचा मृतदेह रुग्णवाहिकेतून धुळ्याकडे हलविण्यात आला.