जळगाव प्रतिनिधी । शहरातील खंडेरावनगर येथे शौचालयाचे बांधकाम सुरू असलेल्या एका घरात आज दुपारी दोन ते तीन दिवसांचे नवजात बालकाचे अर्भक कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, खंडेराव नगरात भाडेकरारावरील एका घरात शेख इरफान शेख पिंजारी हे राहतात. या घराचे पक्के बांधकाम सुरू आहे. गुरुवारी ४ नाव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास या ठिकाणी शौचालयाचे बांधकाम सुरू असताना कामगारांनी पत्र लावण्याचे काम पूर्ण केले. दुसऱ्या दिवशी आज शुक्रवारी ५ नोव्हेंबर रोजी सकाळी दुर्गंधी सुटल्याने परिसरातील नागरिकांनी पाहणी केली असता शौचालयाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी प्लास्टिकच्या गोणीत नवजात बालक कुजलेल्या स्थितीत आढळून आले. त्यामुळेच दुर्गंधी सुटल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांनी रामानंदनगर पोलिसांना प्रकाराबाबत माहिती दिली. माहिती मिळाल्यावर रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक गोपाळ देशमुख, सागर देवरे, नितेश बच्छाव, भूषण पाटील, अतुल चौधरी, संजय तडवी, रेवानंद साळुंखे यांनी घटनास्थळ गाठले. प्लास्टिकच्या गोणीत अंदाजे दोन ते तीन दिवसांचे अर्भक कुजलेल्या स्थितीत आढळून आले. पोलिसांनी अर्भक जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.