जळगाव, (जितेंद्र कोतवाल)। जिल्ह्यातील खूनाच्या गुन्ह्याची आकडेवारी पाहिली असता 1 जानेवारी 2019 ते 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत जिल्हयात तब्बल 53 जणांचा खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. ही आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे. जळगाव सारख्या सर्वसाधारण जिल्ह्यात केवळ १० महिन्यांच्या कालावधीत एवढ्या मोठ्या संख्येने खून होणे, कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक आहे. त्यातच आज (दि.१९) रावेर तालुक्यातील केऱ्हाळा येथील गावात दोन महिलांचा कापसाच्या शेतात निर्घृण खून करण्यात आला. आतापर्यंत 54 खूनाचे गुन्हे झाले आहेत. खुनाची सरासरी काढली असता दरमहा जिल्ह्यात दरमहा 5 ते 6 खून होत असल्याचे निदर्षनास येते.
रावेर तालुक्यातील केऱ्हाळे येथील दोन महिलांच्या हत्याकांडामुळे जिल्हा पुन्हा एकदा हादरला. मागील १० महिन्यात जिल्ह्यात तब्बल 54 खून झाले आहेत. यातील ५१ खुनांचा तापस लागलाय. तर 3 खूनांचा उलगडा अद्याप झालेला नाही. जिल्हा पोलीस प्रशासन कुठे कमी पडतेय का ? पोलीस प्रशासनाचा धाक संपलाय का ? पोलिसांचा कानाडोळा होत आहे का ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहेत.
आज दोन महिलांचा खून
रावेर तालुक्यातील केऱ्हाळा खुर्द येथील नसीमा रुबाब तडवी (वय ५०) व शालूबाई गौतम तायडे (वय ५५) या दोन्ही मजूर महिला सोमवारी सकाळी ११.०० वाजेच्या सुमारस म्हशी व बकऱ्यांना चारा आणण्यासाठी त्या गेल्या होत्या. मंगळवारी (दि.१९) दुपारी साधारण १.०० वाजेच्या सुमारास खेडी शिवारात महिलांचा शोध सुरु असतांना अचानक युवकांना नासिमाचा मृतदेह केऱ्हाळा बुद्रुक येथीलच नारायण रामचंद्र पाटील यांच्या तुरीच्या शेतात तर शालूबाईचा मृतदेह विठ्ठल नारायण सोनवणे यांच्या तुरीच्या शेतात आढळून आला. दोन्ही महिलांचे मृतदेह २० ते २५ फुट अंतरावर पडलेले होते. त्याचं खून होऊन 12 तास झाले आहेत मात्र एकाही संशयित आरोपीचा अद्याप पत्ता लागलेला नाही किंवा पोलीस स्थानकात गुन्हाही नोंदवण्यात आलेला नाही.
जळगाव जिल्ह्याच्या पोलिस यंत्रणेवर एसपी डॉ. पंजाबराव उगले यांचा वचक नाही. त्यांच्या काळात जातीय दंगली वाढल्या, भर रस्त्यात दिवसा खुनाच्या घटना वाढल्या, चोरी-घरफोडांचे प्रकार वाढले, बलात्काराची प्रकरणे वाढली, पोलिस प्रशासनाचा धाक वाटेल असे कोणतेही काम उगले यांच्या काळात झालेले नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन गुन्हेगारांवर नियंत्रण मिळवून नागरिकांना भीतीमुक्त करण्याची मागणी केली जात आहे. शहरासह जिल्ह्यातील विविध भागात जावून जनतेचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी किंवा त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली का?, छडा लावण्यासाठी व प्रतिबंध करण्यासाठी त्यांनी हाती असलेल्या कंट्रोल रूम व अतिरिक्त पोलिस दलाचा उपयोग करून विशेष कृती आराखडा तयार केला आहे का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
1 जानेवारी 2019 ते 31 ऑक्टोबर 2019 पर्यंतच्या महत्वाच्या खूनाच्या घटना
1. 6 ऑक्टोबर 2019 रोजी भुसावळात सामूहीक हत्याकांड झाले. त्यात रवींद्र खरातसह इतर पाच जणांचा खून करण्यात आला.
2. 3 ऑक्टोबर 2019 रोजी डोंगरकठोरा येथील अल्पवयीन मुलाचा निर्घृण खून करण्यात आला.
3. 21 सप्टेंबर 2019 रोजी जळगावात भरदिवसा बांधकाम ठेकेदाराचा खून करण्यात आला.
4. 12 सप्टेंबर 2019 रोजी जामनेर तालुक्यातील पिंपळगाव कमानी तांडा येथे महिलेचा खून करण्यात आला.
5. 31 ऑगस्ट 2019 रोजी भुसावळातील रेल्वे गॅगमनचा क्षुल्लक कारणावरून खून
6. 25 ऑगस्ट 2019 रोजी जळगावातील मनसेचे माजी पदाधिकारी शाम दीक्षित यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला.
7. 19 ऑगस्ट 2019 रोजी समलैंगिक संबधातून जामनेर येथे तरूणाचा खून करण्यात आला.
8. 23 जुलै 2019 रोजी जळगावात मित्रांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून करण्यात आला.
9. 7 जुलै 2019 रोजी बोदवड येथे प्रेमसंबंधातून तृतीयपंथीचा खून झाला.
10. 29 जून 2019 रोजी जळगावात पार्कींगच्या वादातून आसोदा येथील मुकेश सपकाळे या तरूणाचा खून करण्यात आला होता.