पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील धाबे येथील जि.प. प्राथमिक शाळा विविध नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर ठरली असून शाळेने नुतन वर्षाचे स्वागत राज्य आदर्श शिक्षक व मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे आणि वरिष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांच्यावतीने शाळेतील ५७ विद्यार्थ्यांपैकी उपस्थित ५३ विदयार्थ्यांचा सामुहिक वाढदिवस साजरा करुन नवीन वर्षाचे स्वागत केले आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा आनंद दिसून आला आहे.
धाबे हे गाव गरीब आदिवासी वस्ती आहे. सर्व नागरिक हात मजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यामुळे गावात लहान मोठा कोणाचाच कधीच वाढदिवस साजरा केला जात नाही. कोणत्याही प्रकारची विद्यार्थ्यांची हौसही नाही. बालके मात्र सोशल मिडीया किंवा दूरदर्शनवर वाढदिवसाचा प्रसंग बघतात व त्याबाबत चर्चा करायचे. ही गोष्ट धरून शाळेच्या शिक्षकांनी वर्षातुन एकदा सामुहिकपणे का असेना त्यांचा रितीरिवाजानुसार वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले. गेल्या सहा वर्षापासुन ते हा उपक्रम स्व: खर्चाने राबवित असुन हे सातवे वर्ष आहे.
यांनी केली मदत
मुख्याध्यापक साळुंखे यांनी वर्षा अखेर वायफळ खर्च न करता एखादया गरिब व्यक्तीला काही तरी मदत करून हा दिवस साजरा करण्याची पोस्ट व्हॉट्सअप ग्रुपला टाकली होती. त्याला तात्काळ प्रतिसाद देत देवेंद्र सुरेश सावंत (एरंडोलकर रा. चमगाव ता धरणगांव) हल्ली एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी पुणे येथे थ्री डी डीझायनर यांनी या वर्षी बालकांच्या वाढदिवसाचा सर्व खर्च करण्याची तयारी दाखवुन ऑनलाईन पैसे पाठवुन दिले. म्हणुन आजच्या ह्या बालकांना कमालीचा आनंद व समाधान मिळवुन देणाऱ्या उपक्रमाचे प्रायोजक देवेंद्र सावंत यांचे शाळेच्या शिक्षकांनी आभार मानले.
असा पध्दतीनेने साजरा केला सामुहिक वाढदिवस
प्रत्येक विदयार्थ्यांचे पूजन व औक्षण करून तसेच वाढदिवसाची टोपी डोक्यावर घालुन प्रत्येकाचा स्वतंत्र केक तयार करुन त्यांच्या हस्ते तो कापुन त्यांनाच खाण्यासाठी देण्यात आला. तसेच फुगे, दिवे, आकाश कंदिल, वाढदिवस शुभेच्छा फलक विदयार्थ्यांना वाढदिवशी आवडणाऱ्या वातावरणाची निर्मिती करण्यात आली. त्यांना पोटभर गोड जिलेबीचे भोजन देण्यात आले. विदयार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान ओसंडुन वाहत होता.
मुलांचा आनंद गगनाला
एक तर हौस असुनही हा वाढदिवसाचा आनंद त्यांच्या नशिबी नाही. साजरा झाला तर अत्यानंद. या उपक्रमामुळे विदयार्थ्यांमध्ये आत्मसन्मानाची भावना निर्माण होते. त्यांना शाळा व शिक्षक यांच्या बद्दल अधिकचा आदर वाटु लागतो. त्यांची शाळेत उपस्थिती वाढण्यास व टिकुन राहण्यास मदत मिळते. जीवनभरसाठी शाळेची एक सुखद आठवण त्यांच्या मनात घर करते. या कार्यक्रमाला तांबोळे शाळेचे उपशिक्षक विनोद पाटील, महावितरण मंचरचे गौरव शिंपी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाची सजावट व इतर गोष्टींसाठी मयुर शिंपी पारोळा यांचे सहकार्य लाभले.