मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर नगरपंचायतीत नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनंतर आज महत्त्वाच्या पदांवरील निवडी एकमताने झाल्याने स्थानिक राजकारणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवक पदांसाठी झालेल्या या निवडीमुळे नगरपंचायतीच्या कारभाराला स्थैर्य मिळाल्याचे चित्र आहे.

आज झालेल्या निवड प्रक्रियेत उपनगराध्यक्षपदी देवयानी शिरसाट यांची एकमताने निवड करण्यात आली. याचवेळी स्वीकृत नगरसेवकपदी नितीन उर्फ बंटी जैन व छोटू भाऊ भोई यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. सर्व सदस्यांच्या सहमतीने या निवडी पार पडल्याने नगरपंचायतीत सुसंवाद आणि समन्वयाचे वातावरण असल्याचे दिसून आले.

काल नगराध्यक्षपदी संजना ताई चंद्रकांत पाटील यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची निवड झाल्याने प्रशासनाच्या कामकाजाला वेग येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या निवडीदरम्यान नगरपंचायत परिसरात शिवसैनिकांनी मोठी गर्दी करत जल्लोष केला, फटाक्यांची आतषबाजी व घोषणाबाजीमुळे परिसर उत्साहाने दुमदुमून गेला.
निवडीनंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, ही निवड पूर्णपणे एकमताने झालेली असून नगराध्यक्ष संजना चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्यात येईल. जनतेने आणि पक्षाने दाखविलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आम्ही सर्वजण निष्ठेने व जबाबदारीने काम करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.



