Home Cities जळगाव जळगावात भक्तीमय गुढीपाडवा; बालाजी मंदिरात घुमले सुंदरकांडाचे स्वर!

जळगावात भक्तीमय गुढीपाडवा; बालाजी मंदिरात घुमले सुंदरकांडाचे स्वर!


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हिंदू नववर्षाचे स्वागत जळगावात उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात करण्यात आले. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आकाशवाणी चौकाशेजारील श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात दरवर्षाप्रमाणे यंदाही भव्य ‘संगीतमय सुंदरकांड’ पठणाचे आयोजन करण्यात आले होते. सुमधुर भजने आणि भक्तिगीतांच्या स्वरांनी संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.

स्वराभिषेकाने रंगली सायंकाळ :
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे दक्षिण मुखी हनुमान मंदिर (रथ चौक) येथील सत्संग भजन मंडळाचे सादरीकरण. गायक अ‍ॅड. गणेश दायमा, शरद पांडे, सत्यनारायण तिवारी, चंदन जोशी आणि रामकुमार शर्मा यांनी आपल्या सुमधुर आवाजात सुंदरकांडातील चौपायांचे सादरीकरण केले. चंद्रशेखर नरवरिया यांच्या संगीत संयोजनाने कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि गायकांच्या सुरावटींवर उपस्थित भाविकांनी अक्षरशः ठेका धरला होता. या भक्तीमय सोहळ्यामुळे भाविकांमध्ये नववर्षाच्या सुरुवातीलाच एक सकारात्मक ऊर्जा संचारल्याचे पाहायला मिळाले.

महाप्रसादाने सोहळ्याची सांगता
श्री व्यंकटेश बालाजी मंदिराचे श्रीकांत मणियार यांनी या सोहळ्याचे नेटके नियोजन केले होते. सुंदरकांड पठण पूर्ण झाल्यानंतर श्री बालाजींची भव्य आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.


Protected Content

Play sound