Home धर्म-समाज खेडीढोकमध्ये हरिनाम सप्ताहाची भक्तिमय सांगता

खेडीढोकमध्ये हरिनाम सप्ताहाची भक्तिमय सांगता


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील खेडीढोक येथे श्रीराम नवमी ते हनुमान जयंती निमित्त आयोजित अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. आठ दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यात नामसंकीर्तन, कीर्तन आणि आध्यात्मिक संदेशांनी संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले.

दि. 26 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत पार पडलेल्या या किर्तन महोत्सवात विविध नामांकित किर्तनकारांनी हजेरी लावत भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन केले. सप्ताहाच्या सांगता दिनी ह.भ.प. राम महाराज भोणेकर (नंदुरबार) यांच्या काल्याच्या रसाळ किर्तनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या कीर्तनातून नामस्मरणाचे महत्त्व प्रभावीपणे पटवून देण्यात आले.

या सप्ताहात ह.भ.प. चंद्रकांत महाराज आथेकर, ह.भ.प. मुक्ताबाई महाराज आळंदीकर, ह.भ.प. पंकज महाराज एकतास, ह.भ.प. शैलाताई महाराज (मुंबई), ह.भ.प. किशोर महाराज मोरदळकर, ह.भ.प. पांडुरंग महाराज मालपूर आणि ह.भ.प. गोपाल महाराज दापोरी यांनी आपल्या कीर्तनातून भाविकांना अध्यात्मिक संदेश दिले. प्रत्येक कीर्तनाने गावकऱ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत भक्तीभाव अधिक दृढ केला.

सांगता दिनी नामसंकीर्तनाचा गजर आणि विठ्ठल नामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. “नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्म अंतरीचे” या उक्तीचा आधार घेत महाराजांनी कलीयुगात भगवंताच्या नामस्मरणाचे महत्त्व अधोरेखित केले. कीर्तनानंतर पारंपरिक दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रमही उत्साहात पार पडला.

या धार्मिक उपक्रमात विशेष उपस्थिती म्हणून हिंदू धर्मभूषण मनोज महाराज राजपूत (एनगांवकर) यांच्या हस्ते सुमारे 350 युवक-युवतींना तुळशीमाळ परिधान करण्यात आली. यावेळी त्यांनी “पुढच्या पिढीसाठी संस्कारांची शिदोरी अत्यंत आवश्यक आहे,” असे मत व्यक्त केले. तसेच अनेक वर्षांपासून सातत्याने सेवा देणाऱ्या भजनी मंडळांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी ह.भ.प. महेंद्र राजपूत (रामेश्वर), गावातील तरुण मित्र मंडळ तसेच समस्त ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. या धार्मिक सोहळ्यामुळे गावात एकात्मता, श्रद्धा आणि संस्कारांचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील पिढीसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे.

 


Protected Content

Play sound