Home धर्म-समाज यावलमध्ये गुरुचरित्र पारायण सप्ताहाची भक्तीमय सांगता !

यावलमध्ये गुरुचरित्र पारायण सप्ताहाची भक्तीमय सांगता !


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, दिंडोरी प्रणीत, परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मंगलमय आशीर्वादाने यावल शहरात दत्त जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सामूहिक गुरुचरित्र पारायण व अखंड नामजप यज्ञ सप्ताहाची महाप्रसादाने सांगता झाली. भुसावळ रोडवरील टेलिफोन ऑफिसजवळ असलेल्या बालसंस्कार व अध्यात्मिक केंद्रात हा सात दिवसीय भक्तिमय सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सप्ताहात धार्मिक विधींची मांदियाळी

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या गुरुपीठाचे पीठासीन गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात गुरुचरित्र पारायण वाचन, अखंड नामजप यज्ञ, गणेश याग, मनोबोध याग, श्री स्वामी याग, गीताई याग, चंडी याग, रुद्रयाग, मल्हार याग आणि बली पूर्णाहुती अशा विविध यागांचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी श्री दत्त जन्मोत्सव, सत्यदत्त पूजन आणि महाआरती अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडली.

सेवकांचा उत्स्फूर्त सहभाग

या सात दिवसांच्या अखंड नामजप यज्ञ सप्ताहात यावल शहरासह तालुक्यातील महिला व पुरुष सेवकरी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. दिवसा सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत महिलांनी, तर सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पुरुषांनी अखंड नामजप प्रहर सेवेत उत्साहाने सहभाग घेतला. यावल केंद्रात दत्त जयंती सोहळ्यानिमित्त आकर्षक रांगोळी आणि फुलांनी सुंदर सजावट करण्यात आली होती.

समाजाभिमुख विषयांवर मार्गदर्शन

सप्ताह काळात केंद्रातील प्रमुख प्रतिनिधींनी सेवकांना सेंद्रिय शेती, सामूहिक सामुद्रिक शास्त्र, पर्यावरण, प्रकृती, विवाह संस्कार आणि पशुसंवर्धन यांसारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच, जीवनातील अडचणी व समस्यांवर आध्यात्मिक उपायही सांगितले. शुक्रवारी सकाळी भूपाळी आरती, सत्यदत्त पूजन, महानैवेद्य आरती होऊन अखंड नामजप यज्ञ सप्ताहाची सांगता झाली. याप्रसंगी सेवकांना ५ जानेवारी २०२६ रोजी उज्जैन येथे राष्ट्रीय संकट निवारणासाठी आयोजित करण्यात आलेल्या भस्म लिंगार्चन सोहळ्याबद्दलही माहिती देण्यात आली. या यशस्वी सोहळ्यामुळे यावल शहरात अध्यात्मिक विचारांना नवी दिशा मिळाली आहे.


Protected Content

Play sound