Home Cities जळगाव गणेश जयंतीनिमित्त जळगावात भक्तीमय वातावरण 

गणेश जयंतीनिमित्त जळगावात भक्तीमय वातावरण 


जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गणेश जयंतीच्या पावन पर्वानिमित्त जळगाव शहरात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सकाळपासूनच मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भक्तिभाव, पूजन, अभिषेक, कीर्तन आणि महाप्रसाद यांच्या माध्यमातून संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने भारावून गेला होता.

बजरंग बोगद्याजवळील कृषी कॉलनी परिसरात असलेल्या नवसाच्या गणपती मंदिरात गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या मंदिराचा आज २८ वा वर्धापन दिन असल्याने भाविकांचा उत्साह दुणावलेला दिसून आला. पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या असून अनेक भाविकांनी नवसपूर्तीच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. मंदिराचे पुजारी चेतन कपोले गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली विधिवत पूजन व आरती पार पडली. भाविक महेश पाटील यांनीही मंदिराच्या धार्मिक व सामाजिक कार्याचे कौतुक केले.

याचप्रमाणे विसनजी नगर येथील श्री इतर बुद्धी गणेश मंदिर व महादेव मंदिरातही गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी यज्ञ व अभिषेकानंतर गणेश आवर्तन घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. मंदिर पुजारी प्रमोद जोशी यांनी गणेश जयंतीचे धार्मिक महत्त्व विशद करत भाविकांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, जुने जळगाव परिसरात जय हनुमान सांस्कृतिक मित्र मंडळातर्फे यावर्षी शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून काल्याचे कीर्तन झाल्यानंतर भरीतपुरी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमासाठी जुने जळगाव मित्र मंडळ व जय हनुमान सांस्कृतिक मित्र मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन सेवाभावी वृत्तीने काम करताना दिसून आले.

या कार्यक्रमास ललित चौधरी उर्फ भैया भाऊ, हरीश कोल्हे तसेच मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिकच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. भाविकांनी शिवपुराण कथा, कीर्तन आणि महाप्रसादाचा लाभ घेत समाधान व्यक्त केले.


Protected Content

Play sound