
यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय संस्कृतीत नद्यांना माता मानून त्यांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून जपली जात आहे. नद्यांप्रती कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी विविध धार्मिक परंपरा प्रचलित आहेत. त्यामध्ये नर्मदा परिक्रमा ही अत्यंत पवित्र आणि वैशिष्ट्यपूर्ण परंपरा मानली जाते. अशाच या पवित्र परंपरेचे पालन करत मनवेल येथील चंपालाल गोकुळ पाटील यांनी नर्मदा मातेची पाचवी पायी परिक्रमा पूर्ण केली असून गावात त्यांच्या आगमनानंतर ग्रामस्थांनी त्यांचे भक्तीमय वातावरणात उत्स्फूर्त स्वागत केले.

मनवेल येथील चंपालाल गोकुळ पाटील यांनी ११ जानेवारी रोजी मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग येथे संकल्प करून नर्मदा मातेच्या पायी परिक्रमेची सुरुवात केली होती. जवळपास ४८ दिवसांच्या कठीण प्रवासानंतर त्यांनी दि. १ मार्च २०२६ रोजी ही परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण केली. नर्मदा परिक्रमा ही अत्यंत खडतर आणि संयमाची परीक्षा पाहणारी यात्रा मानली जाते. या यात्रेदरम्यान मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांतील सुमारे २२ जिल्ह्यांमधून जवळपास साडेतीन हजार किलोमीटरचा पायी प्रवास करत नर्मदा मातेच्या काठाने परिक्रमा पूर्ण केली जाते.
या प्रवासादरम्यान शूलपानी, लक्कडकोट, चव्यन, अमरकंटक आणि सातपुडा पर्वतरांगांतील घनदाट जंगल तसेच डोंगरदऱ्या पार करत अनेक पर्वतांना वळसा घालत ही यात्रा पूर्ण करण्यात आली. या काळात दररोज नर्मदा मातेची पूजा, संध्यावंदन, नित्यपाठ तसेच ‘नर्मदे हर’ या नामजपाचे अखंड स्मरण करत त्यांनी संपूर्ण परिक्रमा पूर्ण केली. पाठीवर आठ ते दहा किलो वजनाची दैनंदिन साहित्याची बॅग घेऊन वयाच्या ५८ व्या वर्षीही त्यांनी थंडी, पाऊस, थकवा किंवा कोणत्याही शारीरिक त्रासाला न जुमानता दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ही परिक्रमा पूर्ण केली.
दि. ५ मार्च २०२६ रोजी परिक्रमा पूर्ण करून चंपालाल पाटील मनवेल गावात परतल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी त्यांनी गावातील श्री मानकेश्वर महादेव मंदिर, महर्षी वाल्मिकी ऋषी मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर तसेच धुनीवाले दादाजी दरबार येथे जलपूजन करून पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. या प्रसंगी गावातील अनेक नागरिक, भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नर्मदा परिक्रमा पूर्ण करून गावात परतलेल्या भाविकाच्या स्वागताने मनवेल गावात भक्तीमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांच्या या आध्यात्मिक प्रवासामुळे गावकऱ्यांमध्ये श्रद्धा आणि आध्यात्मिकतेची भावना अधिक दृढ झाली असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.



