देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी कायम; केंद्रीय कार्यकारिणीचा निर्णय

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीत अपयश आले असले तरी राज्य भाजपमध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत, असे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने मंगळवारी स्पष्ट केले. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी करणारे देवेंद्र फडणवीस त्या पदावर कायम राहणार असल्याचे अधोरेखित झाले आहे. लोकसभेच्या वेळी झालेल्या चुका दुरुस्त करून विधानसभेला सामोरे जाण्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत राज्यातील भाजप नेत्यांची बैठक नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात झाली. केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार आदी नेते यावेळी उपस्थित होते. राज्य भाजपमध्ये कोणतेही बदल केले जाणार नसल्याचे बैठकीनंतर गोयल यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर सरकारमधून बाहेर पडून पक्ष कार्यावर भर देण्याची इच्छा व्यक्त करणारे फडणवीस हेच आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत उपमुख्यमंत्रीपदी कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळे हेच कायम राहतील. विधानसभेसाठी कोणती रणनीती आखायची याचा आढावा घेण्यात आला.

महायुतीतील घटक पक्षांबरोबर जागावाटपाची चर्चा सुरू केली जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्र भाजपच्या पाठीशी ताकदीने उभे असून विधानसभा निवडणूक जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचा काहीही प्रभाव पडला नसल्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेना शिंदे गटाची मतेही भाजपच्या उमेदवारांना मिळाली नसल्याकडेही राज्यातील नेत्यांनी लक्ष वेधल्याचे समजते. या अनुषंगाने जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहील, यावर बैठकीत खल झाल्याचे बोलले जात आहे.

Protected Content