Home Cities जळगाव कडगावात ४२ लाखांच्या विकास कामांचे लोकार्पण

कडगावात ४२ लाखांच्या विकास कामांचे लोकार्पण


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कडगाव येथे आज (रविवार, २८ जुलै) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ४२ लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये आधुनिक सामाजिक सभागृह, सुसज्ज व्यायामशाळा आणि मरीमाता मंदिराच्या परिसरातील सभामंडपाचा समावेश आहे. श्रावण सोमवारच्या शुभ मुहूर्तावर ही विकासकामे जनतेला समर्पित करण्यात आली.

या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले की, “ही व्यायामशाळा म्हणजे केवळ दंड-बैठका मारण्याची जागा नसून, नव्या पिढीच्या शारीरिक आणि मानसिक घडणीसाठीची ही एक प्रयोगशाळा आहे.” त्याचबरोबर, “सामाजिक सभागृह हे गावाच्या एकतेचे प्रतीक असून, मरीमाता मंदिरातील सभामंडप श्रद्धा आणि संस्कृती यांची सांगड घालतो,” असेही त्यांनी अधोरेखित केले. कडगावच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

या ४२ लाख रुपयांच्या विकासकामांमध्ये कडगाव येथील धनगर वाड्यात १५ लाख रुपये खर्चून उभारलेले सामाजिक सभागृह, १५ लाखांच्या निधीतून साहित्यासह बांधलेली आधुनिक व्यायामशाळा आणि १२ लाख रुपये खर्चून तयार करण्यात आलेला मरीमाता मंदिर परिसरातील सभामंडप यांचा समावेश आहे. ही सर्व कामे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

यावेळी कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सरपंच मिलिंद चौधरी, सामाजिक कार्यकर्ते तुषार महाजन, योगेश कोळी, सरपंच सौ. अलकाबाई कोळी, उपसरपंच प्रवीण कोळी, ग्रामपंचायत सदस्य राजेश पाटील, सचिन पाटील, दीपक कोळी, किरण धनगर, नवल कोळी, नंदू कोळी, नरेंद्र सपकाळे, मधुकर धनगर, सागर कोळी, संदीप कोळी, भूषण पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण धनगर यांनी केले, तर योगेश कोळी यांनी आभार प्रदर्शन केले.


Protected Content

Play sound