यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामसेवक गेल्या सहा महिन्यांपासून नियमितपणे अनुपस्थित राहत असल्याने संपूर्ण गावाचा विकास ठप्प झाल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य सत्तार समशेर तडवी यांनी जिल्हा परिषद, जळगाव येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात केली आहे.
ग्रामपंचायत कार्यालय सतत कुलूपबंद असल्यामुळे नागरिकांना आपल्या समस्या मांडता येत नाहीत तसेच कोणतेही शासकीय कामकाज सुरळीत पार पडत नाही, असा आरोप तडवी यांनी निवेदनात केला आहे. विशेष म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेले घरकुल प्रस्ताव असूनही अद्याप पहिला हप्ता लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेला नाही.
सत्तार तडवी यांनी त्यांच्या निवेदनात नमूद केले आहे की, सरपंच व ग्रामसेवक ग्रामपंचायत बैठकीचे अजेंडा देखील सदस्यांना देत नाहीत. त्यांच्या या गोंधळलेल्या कारभारामुळे ग्रामस्थांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संबंधित दोघांवर त्वरित कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. जर सदर तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली नाही, तर कोरपावली ग्रामस्थ पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन व उपोषण करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.