जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज : जळगाव विमानतळाच्या विस्तार आणि सुविधांसाठी खासदार स्मिता वाघ यांनी केलेल्या पाठपुराव्याला केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नागरी विमानन मंत्रालयाने या प्रकल्पाकडे गांभीर्याने लक्ष देत रनवे विस्तार, टर्मिनल सुधारणा, विमानसेवा वाढ आणि विमानतळाची क्षमता वाढविण्याच्या मागण्यांवर काम सुरू केले आहे. नागरी विमानन मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेत याबाबत अधिकृत माहिती सादर केली.
मंत्री मोहोळ यांच्या माहितीनुसार, विमानतळाच्या टर्मिनलचा विस्तार ५०० चौ. मीटर पर्यंत करण्याचे काम सुरू आहे. यामुळे प्रस्थान आणि आगमन लाउंजमध्ये प्रत्येकी ७५ प्रवाशांना सोय होईल. याव्यतिरिक्त, सॅक बार, ट्रॉली व्यवस्थापन आणि वाहनतळ सुधारण्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. हे उपक्रम पूर्ण झाल्यास प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध होतील.
विमानतळाचा मास्टर प्लॅन अंतिम टप्प्यात असून, भविष्यात टर्मिनल आणि एप्रन उत्तरेकडे हलविण्याचा प्रस्ताव आहे. पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी नियोजन केले असून, प्रवाशांच्या संख्येत वाढ आणि विमानसेवेच्या गरजेनुसार पुढील विस्ताराची तयारीही मंत्रालयाने व्यक्त केली आहे.
खासदार स्मिता वाघ यांनी जळगावसाठी अधिक विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली होती. यावर मंत्रालयाने स्पष्ट केले की, सध्या एखाद्याही एअरलाइनकडून अतिरिक्त उड्डाणांसाठी प्रस्ताव नसला, तरी भविष्यात मागणी आल्यास त्यावर सकारात्मक विचार होईल.
या प्रकल्पाबद्दल बोलताना खासदार वाघ म्हणाल्या, “केंद्र सरकार विमानतळाच्या सुधारणांसाठी सहकार्य करत आहे. प्रकल्प लवकर पूर्ण व्हावेत म्हणून आम्ही पाठपुरावा करत आहोत. अधिक विमानसेवा मिळविण्यासाठी व्यापाऱ्यांसोबत संवाद साधून रणनीती राबवली जाईल. हा विमानतळ जळगावच्या औद्योगिक, शैक्षणिक आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला चालना देईल.”