यावल ( प्रातिनिधी) येथील महसुल प्रशासनाच्या पथकाने तालुक्यातील विविध ठीकाणाहुन पकडलेल्या अनधिकृतपणे गौण खनिजाची वाहतुक करणाऱ्या दोन ट्रक आणि तीन ट्रॅक्टर वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. या पकडण्यात आलेल्या वाहन मालकांना दंड भरण्याची शेवटी मुदत नोटीसीव्दारे कळवण्यात आली होती, ती मुद्दत संपल्याने या वाहनांचा गौण खनिजासह लिलाव करण्यात येणार असल्याची माहीती महसुल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
या संदर्भात तहसीलदार जितेन्द्र कुंवर यांनी दिलेली माहिती अशी की, यावल महसुल प्रशासनाच्या वाळु माफीयांविरूद्ध सुरू करण्यात आलेल्या धडक मोहिमेअंतर्गत तालुक्यातुन विविध ठीकाणाहुन मंडळाधिकारी व तलाठी यांच्या संयुक्त पथकाने अनधिकृत गौण खनिज वाहतुक करणारे सुपड्र रमेश सोळंके (रा. कोळन्हावी ता. यावल) यांच्या मालकीचे वाहन अनधिकृतपणे तीन ब्रास गौण खनिज वाहतुक करतांना मंडळाधिकारी बामणोद यांनी चितोडा फाटयावर दिनांक २०/११/१८ रोजी पकडले होते. त्यांना २ लाख ६८ हजार २२४ इतकी दंडाची रक्कम भरावी, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. दिनांक २९/११/२०१८ रोजी शांताराम राजाराम धनगर (रा. बोरावल ता. यावल) यांच्या मालकीचे वाहन (क्रमांक एम.एच. १९,बी.जी.२६९३) हे वाहन ताब्यात घेवुन दंडाची १ लाख २२ हजार ७४१ रुपये ही रक्कम भरण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे. दिनांक ७/९/२०१८ रोजी शिवलाल भागवत कोळी (रा.पिंप्री ता. यावल) यांच्या मालकीचे वाहन (क्रमांक एम.एच. २८डी. ३८४६) पकडुन १ लाख २२ हजार ७४१ रूपये ही रक्कम भरण्याची नोटीस बजावली आहे. दिनांक ५/४/२०१९ रोजी ज्ञानेश्वर नामदेव तायडे (रा.कोळन्हावी ता. यावल) यांचे वाहन (क्रमांक एम.एच. ४९ झेड ४७४९) यास परसाडे शिवारात सुमारे २ ब्रास वाळु वाहतुक करतांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना २ लाख ४५ हजार ४९३ रुपये दंडाची रक्कम भरण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे २७/४/२०१९ रोजी मंडळधिकारी व तलाठी यांच्या पथकाने न्हावी प्रगणे अडावद या परिसरातुन बाळु दगडु तडवी (रा. हिंगोणा ता. यावल) यांच्या मालकीचे वाहन (क्र. एम.एच. १९, ६२६७) जप्त केले असुन त्यांना दंडाची १ लाख ०३ हजार ३३० इतकी रक्कम भरण्याची नोटीस देण्यात आली आहे, या सर्व वाहन मालकाना बजावण्यात आलेल्या नोटीसीचा अवधी संपला असुन त्यांनी सात दिवसांच्या आत आकारण्यात आलेली दंडांची रक्कम न भरल्यास महसुल प्रशासनाच्या वतीने दंडाची रक्कम वसुली करण्याकरीता वाळुसह वाहनांचाही लिलाव केला जाणार असल्याची माहीती तहसीलदारांनी दिली आहे.