भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । “मानवाच्या जीवनात जेव्हा प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते, तेव्हाच तो परमेश्वराच्या आठवणीने हरीभक्ती करतो; मात्र अनुकूलता आली की तोच परमेश्वर विस्मरणात जातो,” अशा शब्दांत ह.भ.प. किशोर महाराज तळवेलकर यांनी कालियुगातील सच्च्या साधनेचा मार्ग स्पष्ट केला. हरी कृपा झाल्यास प्रारब्धही बदलू शकते, असे स्पष्ट करत त्यांनी सातत्याने नामस्मरणाचे महत्त्व अधोरेखित केले. हा मार्गदर्शनपर संदेश भुसावळ येथील वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक सभेत त्यांनी दिला.

ओम सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान संचलित या सभेचे आयोजन रिंग रोडवरील सभागृहात झाले. अध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव सतीश जंगले, प्रमुख पाहुणे किशोर महाराज, संजय चौधरी, भानुदास पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. विश्व प्रार्थना व हनुमान चालीसा पठणाने प्रारंभ झालेल्या या सभेचा मुख्य गजर “हरे राम हरे राम, राम राम हरे हरे…” याने वातावरण भक्तिमय झाले.

“ज्येष्ठ आणि धर्म” या विषयावर बोलताना किशोर महाराज म्हणाले की, धर्माचा स्वीकार हा आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर का करायचा? लहानपणापासून जर भक्तीची गोडी निर्माण झाली, तर तारुण्य अधिक समृद्ध आणि शुद्ध जाईल. आजच्या काळात वडीलधाऱ्यांनी आपल्या नातवंडांना धार्मिक कार्यात सहभागी करून घेणे अत्यावश्यक आहे, असे ते म्हणाले. ज्येष्ठांनी आता कुटुंबातील जबाबदाऱ्या नव्या पिढीकडे सोपवून मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमात शशिकला ढाके, प्रकाश चौधरी, शरद पाटील, सुहास मुजुमदार, सतीश जंगले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांना उपरणे आणि पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. शरद पाटील यांनी यावेळी सर्व उपस्थितांना मिठाई वाटप केले. सभेसाठी परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी हजेरी लावली होती. त्यामध्ये सुरेश बेलसरे, पुंजो भारंबे, रमण भोगे, प्रमोद बोरोले, विजया भारंबे, अशोक नेहेते, विकास राणे यांच्यासह अनेक सभासद सहभागी झाले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिव सतीश जंगले यांनी केले. तर संपूर्ण आयोजनाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश पाटील, संजय चौधरी, प्रभाकर झांबरे, धनराज पाटील, भास्कर खाचणे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचा समारोप विश्वकल्याण प्रार्थनेने झाला.
राम अजून लांब जातो… या आपल्या विनोदी पण अर्थपूर्ण शैलीत किशोर महाराज म्हणाले, “वयोवृद्ध झाल्यावर बोबडी वळते, आणि ‘राम’ म्हणताना ‘लांम लांम’ असा उच्चार होतो. त्यामुळेच लहानपणापासून राम नामाची सवय लावा, म्हणजे पुढचं आयुष्य सुंदर आणि सुखमय जाईल.”



