Home Cities अमळनेर ‘ओला दुष्काळ असूनही सरकार शांत’; अमळनेरमध्ये बच्चू कडूंची सरकारवर टीका

‘ओला दुष्काळ असूनही सरकार शांत’; अमळनेरमध्ये बच्चू कडूंची सरकारवर टीका


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुष्काळ पडल्यावर कर्जमाफीची घोषणा करणारे मुख्यमंत्री आज ओला दुष्काळ असतानाही काहीच बोलायला तयार नाहीत, अशी खंत माजी आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली. अमळनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित साथी गुलाबराव पाटील स्मृती सोहळ्यात ते बोलत होते. ज्या शेतकऱ्यांच्या मतांवर आमदार आणि खासदार निवडून येतात, त्यांच्यावरच सर्वात जास्त अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

‘समाजमन चोरीला गेले’
बच्चू कडू यांनी यावेळी समाजातील वाढत्या उदासीनतेवरही टीका केली. ते म्हणाले, “शेतकऱ्यांच्या आंदोलनापेक्षा गावातील गणपती बसवायला जास्त लोक एकत्र येतात. मत चोरीपेक्षा समाजमनच चोरीला गेल्याचे हे द्योतक आहे.” गावागावात जात, धर्म आणि पंथ यामुळे शेतकऱ्यांची लढाई मोठी होत नाही, असे सांगत त्यांनी नेत्यांसाठी निष्ठावान असणारे कार्यकर्ते शेतकऱ्यांसाठी घातक ठरत असल्याचे नमूद केले.

पुरोगामी विचारधारेचा जागर
यावेळी माजी आमदार बच्चू कडू यांना ‘साथी गुलाबराव पाटील पुरोगामी राजकीय पुरस्कार’ तर ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांना ‘सामाजिक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. याप्रसंगी निरंजन टकले यांनी देशातील राजकीय स्थितीवर प्रकाश टाकला. ‘आधी मतदार सरकार निवडायचे, आता सरकार मतदार निवडते,’ अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. त्यांनी राष्ट्रपती भवनाकडून माहिती अधिकाराखाली मिळालेल्या उत्तराचा दाखला देत उपराष्ट्रपती पदाच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उभे केले. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी अध्यक्षीय भाषणात, जातीयवादाच्या नावाखाली तरुणांचे माथे भडकवले जात असल्याची खंत व्यक्त करत, धीराने काम केल्यास लोकशाही मूल्यांचा विजय होईल असा आशावाद व्यक्त केला.

विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव
यावेळी ‘साथी संदेश वक्तृत्व करंडक’ स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना डॉ. सुधीर तांबे आणि निरंजन टकले यांच्या हस्ते पारितोषिके, रोख रक्कम आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. साने गुरुजी कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात केली. संस्थेचे पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound