मुंबई (वृत्तसंस्था) ‘ज्या संजय निरुपम यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘लुख्खा’ म्हणून हिणवले, त्याच काँग्रेसला आणि निरुपम यांना मतदान करण्याची वेळ आज मनसेच्या कार्यकर्त्यांवर आली आहे. हा मनसेच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार आहे’, अशी खोचक टीका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.
मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज यांनी पंतप्रधान मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेला तावडे यांनी यावेळी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘कालच्या भाषणासाठी राज ठाकरेंनी जसे कष्ट घेतले, ते आधी घेतले असते तर आज दुसऱ्यासाठी सभा घेण्याची वेळ आली नसती. स्वत:चे बंद पडलेले इंजिन दुसऱ्याकडे जोडून चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत.’
पवारांना गांधी चालतील का ?
राहुल गांधी यांना पंतप्रधान करा. मग देश चालेल तरी नाही तर खडड्यात तरी जाईल असं राज म्हणाले होते. त्यावर तावडे यांनी जोरदार आक्षेप घेतला. ‘हा सव्वाशे कोटी लोकसंख्येचा देश आहे. हा काही खेळ नाही. खडड्यात जायला तो काय मनसे पक्ष आहे का, असा उपरोधिक सवालही त्यांनी केला. ‘राहुल गांधी पंतप्रधान म्हणून चालतील का ? हे आधी शरद पवार यांना विचारून घ्या, नाहीतर तुमच्या पुढील स्क्रिप्ट बंद होतील,’ असा टोलाही तावडे यांनी हाणला.
शरद पवार, भुजबळ, अजित पवार यांच्याविरुध्द राज ठाकरे आधी काय बोलले होते हे आठवून बघा, असे सांगून तावडे म्हणाले, भारतात लोकशाही व मानवी हक्काची जपणूक नसती तर युनायटेड नेशन्स ह्युमन राइटस कौन्सिलच्या सर्वोच्च परिषदेवर सुमारे १९३ देशांपैकी १८८ देशांनी भारताला पाठिंबा देऊन निवडून दिले असते का? जगातील सर्व देश मूर्ख आणि तुम्हीच खरे आहात का?’
ही भाषा मराठी माणसाची नाही!
‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊन चालणाऱ्यांनी हा नको म्हणून दुसऱ्याला मतं द्या, असं म्हणणं बरोबर नाही. राज यांनी कालच्या मेळाव्यात जी भाषा वापरली ती मराठी माणसाला आवडत नाही. त्यांचं असं बोलणं निवडणूक आचारसंहितेत बसत नाही,’ असंही तावडे म्हणाले.