
धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत आता वैयक्तिक चारित्र्य हननासारख्या अत्यंत गंभीर आणि गलिच्छ राजकारणाने प्रवेश केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षाच्या एका नेत्याने नगराध्यक्षपदाच्या महिला उमेदवाराबद्दल अतिशय खालच्या स्तराचे, बदनामीकारक आणि भावना दुखावणारे शब्द वापरल्याबद्दल संबंधित उमेदवाराच्या समर्थकांनी गुरूवारी ४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता थेट धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, धरणगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत महाराष्ट्र जनविकास आघाडीकडून वैशाली विनय भावे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. दरम्यान, कोट बाजार परिसरात झालेल्या प्रचारसभेमध्ये विरोधी गटातील नेते रमेश माणिक पाटील यांनी आपल्या भाषणात वैशाली भावे यांच्या संदर्भात हीन दर्जाचे, वैयक्तिक आयुष्यावर टीका करणारे तसेच जातीबद्दल चुकीचे व बदनामीकारक वक्तव्य केले, ज्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का पोहोचला आणि त्यांचे चारित्र्य हनन झाले, असे तक्रारीत म्हटले आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत, भारती हेमंत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिलांनी आज धरणगाव पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले आहे. दिलेल्या निवेदनानुसार, रमेश माणिक पाटील यांच्या या वक्तव्यामुळे वैशाली भावे यांच्यासह समस्त महिला वर्गाच्या भावना दुखावल्या आहेत. महिला उमेदवाराबद्दल सार्वजनिक सभेत अशी भाषा वापरणे हे लोकशाही मूल्यांना आणि महिलांच्या सन्मानाला काळिमा फासणारे आहे.
तक्रारदार महिलांनी पोलिसांकडे मागणी केली आहे की, रमेश माणिक पाटील यांच्या विरोधात तातडीने गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेशीररित्या कडक कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात कोणतीही व्यक्ती निवडणुकीच्या नावाखाली महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याची हिंमत करणार नाही. यावेळी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले आहे.



