मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नवरात्रोत्सवाच्या पावन निमित्ताने मुक्ताईनगर येथे आयोजित शक्ती समर्पण महायज्ञ अंतर्गत संत मुक्ताई मंदिरात भाविकांच्या साक्षीने एक भव्य आणि भक्तीमय समर्पण सोहळा पार पडला. राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आयोजित या सोहळ्यात संत मुक्ताईच्या चरणी महावस्त्र आणि सौभाग्य अलंकार अर्पण करण्यात आले. या धार्मिक उपक्रमामुळे परिसरात भक्तिभावाचे अनोखे वातावरण निर्माण झाले आहे.

शनिवार, दिनांक २७ सप्टेंबर रोजी मुक्ताईनगर व कोथळी येथील संत मुक्ताई मंदिरात हा समर्पण सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्या हस्ते संत मुक्ताईचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने महावस्त्र आणि सौभाग्य अलंकार मुक्ताई मातेच्या चरणी अर्पण करण्यात आले.

या वेळी बोलताना अक्षय महाराज भोसले म्हणाले की, “राज्यभरातील २५ आदिशक्ती तीर्थक्षेत्रांमध्ये शक्ती समर्पण महायज्ञाच्या माध्यमातून देवीच्या भक्तिभावाचा जागर घडवून आणण्याचा हेतू आहे. संत मुक्ताई या ज्ञानेश्वरी परंपरेतील महान संत असून, त्यांच्या चरणी समर्पित महावस्त्र व अलंकार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे.” या यज्ञामुळे राज्यातील अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि भक्तिपरंपरेचे जतन होत असल्याचे त्यांनी सांगितले.
समर्पण सोहळ्याच्या निमित्ताने मुक्ताईनगर व कोथळी परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती होती. यावेळी मुक्ताई पालखी सोहळ्याचे प्रमुख ह.भ.प. रवींद्र हरणे महाराज, कोथळी मंदिराचे व्यवस्थापक ह.भ.प. उद्धव जुनारे महाराज, विनायकराव हरणे, ज्ञानेश्वर हरणे, राम जुनारे आदी मान्यवर व संस्थानचे विश्वस्तही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरातील भाविकांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला. संत मुक्ताईच्या चरणी अर्पण करण्यात आलेले महावस्त्र व अलंकार हे भक्ती, श्रद्धा आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक ठरले असून, नवरात्रोत्सवाच्या भक्तिमय वातावरणाला या उपक्रमाने एक वेगळेच तेज प्राप्त झाले आहे.



