मुंबई (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीत लक्षणीय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वतंत्र स्थान निर्माण करू पाहणाऱ्या वंचित बहुजन आघाडीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच फूट पडली आहे. वंचित आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप केले आहेत. प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा द्यावा, असे म्हणत लक्ष्मण मानेंनी खळबळ उडवून दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीतून फारकत घेतलेले वंचितचे महत्त्वाचे नेते लक्ष्मण माने यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीकास्त्र सोडत वंचितमध्ये उभी फूट पडत असल्याचे अधोरेखित केले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या कामाची पद्धत पाहता आपण त्यांच्यासोबत काम करू शकत नसल्याचे सांगताना, पक्षात संघाच्या लोकांना स्थान देणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनीच आता राजीनामा द्यावा, अशी मागणी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माने यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकरांमुळेच लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एकही जागा निवडून आली नाही. संघ आणि भाजपाच्या लोकांना प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडीमध्ये घेतले आहे.
प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचा दुरुपयोग करत आहेत. संघ आणि आरएसएसच्या लोकांनी वंचित बहुजन आघाडी व्यापून टाकली आहे. त्यामुळे सध्याची वंचित आघाडी ही बहुजनांची नव्हे, तर उच्चवर्णीयांची झाली आहे. वंचित बहुजन आघाडी ही खरी आमची आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी तात्काळ राजीनामा द्यावा, असे लक्ष्मण माने म्हणाले आहेत. राज्यभर आम्ही खपलोय. पदरचे पैसे घालून काम केले आहे. हे आयत्या बिळावरचे नागोबा असल्याचे म्हणत त्यांनी पडळकरांना लक्ष्य केले आहे. तर माने यांचे दुखणे काही वेगळेच आहे असे पडळकर म्हणाले. पक्षाच्या प्रवक्तेपदासाठी माने यांनीच आपले नाव सूचवले, तसेच अनुमोदनही त्यांनीच दिले, याकडेही पडळकर यांनी लक्ष्य वेधले.