भुसावळ प्रतिनिधी । संपूर्ण महाराष्ट्रात नुकताच ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जिल्ह्यात सुद्धा अनेक ग्रामपंचायतीची मुदत संपली असण्याने त्या सर्व ठिकाणी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीची निवडणूक वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी जाहीर केले.
तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामास लागावे असे आवाहन केले आहे. संपूर्ण जिल्ह्यातील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे पक्षाध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी सोशल इंजिनिअरिंग करून यशस्वी केलेला ‘अकोला पॅटर्न’ जळगाव जिल्ह्यात राबवला जाणार आहे. यासाठी, ‘गाव तिथे शाखा व वार्ड तिथे बूथ’ हे धोरण राबलले जात असून अनेक ग्रामपंचायतीत वंचित चे सदस्य निवडून कसे येतील या बाबत नियोजन करण्यात आले आहे असे विनोद सोनवणे यांनी सांगितले.
ग्रामपंचायत निवडणुकीत ज्यांना ज्यांना वंचित तर्फे निवडणूक लढवायची असेल त्या सर्व इच्छुक उमेदवारांनी , जिल्हाध्यक्ष, जिल्हा महासचिव, सर्व तालुकाध्यक्ष व तालुका सचिव यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा महासचिव दिनेश इखारे, जिल्हा सचिव संजय सुरडकर यांनी केले.