चोपडा (प्रतिनिधी) हवामानावर आधारित पीक विम्याची रक्कम बँकांनी परस्पर कर्ज खात्यात जमा केली आहे. ती बचत खात्यात जमा करावी, या बाबतचे निवेदन तहसीलदार अनिल गावित यांना पंचायत समितीचे उपसभापती एम व्ही पाटील व शेतकऱ्यांनी नुकतेच दिले आहे.
तालुक्यातील मोहीदे, अजंटीसिम,वढोदा, विटनेर, दगडी येथील शेतकऱ्यांना २०१८-१९ चा हवामानावर आधारित केळी पीकविमा काढला होता. सदर वर्षी उष्णता व थंडी या दोन्ही जास्त प्रमाणात असल्याने केळी पिकविम्याची रक्कम मंजूर झाली आहे. ती रक्कम स्टेट बँक ऑफ इंडिया, देना बँक,सेंट्रल बँक या बँकेच्या कर्ज खात्यात जमा झाली आहे. या बँकांनी ती परस्पर कर्ज खात्यात वर्ग केली आहे. तसेच सदर वर्षात चोपडा तालुका दुष्काळी जाहीर झाला असून हवामान उष्णता व थंडीमुळे पिकांवर परिणाम झाला आहे. तरी सदरील रक्कम ही शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा करण्यात यावी,असे या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनासाठी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. तसेच निवेदन अर्जावर पंचायत समितीचे उपसभापती एम व्ही पाटील, डॉ हनुमंत पाटील,हिरालाल पाटील ,तुकाराम पाटील,समाधान संतोष पाटील,मंगल बुंधा पाटील,चंद्रकांत बावीस्कर आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.