जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । वर्षभरासाठी हद्दपारीची कार्यवाही झालेल्या अशोक गोवर्धन तायडे (वय ४६, रा. अट्रावल, ता. यावल) हा जळगाव शहरातील जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात सोमवारी २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता फिरतांना शहर पोलिसांना मिळून आला. त्याच्याविरुद्ध रात्री ८ वाजता शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील अट्रावल येथील अशोक तायडे यांच्यावर एक वर्षासाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. हद्दपारीचे आदेश असतांना तो कोणत्याही परवानगी विना जळगाव शहरातील जिल्हा परिषदेच्या आवारात सोमवारी २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास फिरत होता. दरम्यान, याबाबतची माहिती शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी प्रणय पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ संशयित अशोक तायडे याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याविरुद्ध रात्री ८ वाजता शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ उमेश भांडारकर हे करीत आहे.