जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातून हद्दपार असलेल्या गुन्हेगार विजय उर्फ पलटी प्रताप चौधरी रा. पारोळा याला जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धरणगाव चौफुलीवरून बुधवार १३ मार्च रोजी सकाळी १० वाजता अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी गुन्हेगाराला पारोळा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पारोळा पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेला गुन्हेगार विजय उर्फ पलटी प्रताप चौधरी याला जळगाव जिल्ह्यातून १ वर्षापासून हद्दपार करण्यात आले होते. दरम्यान, हद्दपार असतांना गुन्हेगार विजय चौधरी हा पारोळा शहरातील धरणगाव चौफुली येथे आला असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने बुधवारी १३ मार्च रोजी सकाळी १० वाजता कारवाई करत गुन्हेगार विजय उर्फ पलटी चौधरी याला अटक केली. पुढील कारवाईसाठी त्याला पारोळा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कवीता नेरकर, विभागीय पोलीस अधिकारी सुनिल नंदवालकर, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गणेश वाघमारे, पोहेकॉ नंदलाला पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भगवान पाटील, राहूल बैसाने, मोतीलाल चौधरी यांनी केली.