Home Cities जळगाव जळगावात विभागस्तरीय तंत्रप्रदर्शन 2026 उत्साहात

जळगावात विभागस्तरीय तंत्रप्रदर्शन 2026 उत्साहात


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात आज विभागस्तरीय तंत्रप्रदर्शन 2026 उत्साहात आणि दिमाखात पार पडले. कौशल्याधारित शिक्षणाला चालना देणाऱ्या या प्रदर्शनात विविध जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण करत उपस्थितांची दाद मिळवली. उद्योगाभिमुख शिक्षण आणि तांत्रिक कौशल्यांची झलक या प्रदर्शनातून पाहायला मिळाली.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नाशिक, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय जळगाव आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील संस्थेच्या प्रांगणात या तंत्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे आणि सहसंचालक नाशिक अनिल गावित यांच्या हस्ते झाले.

यावेळी शासकीय तंत्रनिकेतन जळगाव चे प्राचार्य पराग पाटील तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव चे प्राचार्य डॉ. सुहास गाजरे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. कार्यक्रमास संदीप गायकवाड (सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास विभाग), आयएमसी सदस्य मानस बोरवले, सागर येवले, श्रीमती पी. पी. चव्हाण (जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी) तसेच नितीन प्रल्हाद चौधरी (प्रभारी प्राचार्य) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या तंत्रप्रदर्शनात जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर आणि नाशिक या जिल्ह्यांतील आयटीआय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध तांत्रिक मॉडेल्स, यंत्रणा आणि नवकल्पनांमधून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभाव स्पष्ट दिसून आला. ऊर्जा बचत, स्वयंचलित यंत्रणा, शेतीपूरक उपकरणे आणि औद्योगिक उपयोगाच्या साधनांवर आधारित प्रकल्पांनी विशेष लक्ष वेधले.

प्रदर्शनानंतर परीक्षकांनी निवडलेल्या नऊ उत्कृष्ट विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. या विजेत्यांची निवड राज्यस्तरीय डिपेक्स प्रदर्शनासाठी करण्यात आली असून त्यांना राज्य पातळीवर आपल्या कौशल्याचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून पुढील स्पर्धांसाठी त्यांना प्रेरणा मिळाली आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. पी. सूर्यवंशी यांनी केले, तर आभार रमेश सपकाळ यांनी मानले.


Protected Content

Play sound