औरंगाबाद (वृत्तसंस्था) भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादमध्ये युती धर्म पाळला नसल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. दानवेंनी युती धर्म मोडत जावयाला मदत केली, असे म्हणत खैरेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याकडे तक्रार केली आहे. औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आहे.
खासदार चंद्रकांत खैरे हे गेल्या 15 वर्षांपासून औरंबादचे खासदार म्हणून कार्यरत आहेत. मात्र, यंदा चंद्रकांत खैरे यांना लोकसभा निवडणुकीत तगडे आव्हान मिळाले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून आमदार इम्तियाज जलील यांनी खैरेंना टक्कर दिली. तर, काँग्रेसकडून सुभाष झांबड यांचेही आव्हान खैरेंना होते. त्यातच, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांनीही अपक्ष निवडणूक लढवली. त्यामुळे महायुतीच्या प्रचारात दानवेंचा सक्रीय सहभाग दिसला नाही. याउलट दानवेंनी आपल्या जावयालाच मदत केल्याचा आरोप चंद्रकांत खैरेंनी केला आहे. दरम्यान,दानवे आणि त्यांचे जावई जाधव यांना आवरा” अशी तक्रार खैरे यांनी अमित शाह यांना भेटून केली. त्यावर शाह यांनी आपल्याला निश्चिंत राहण्याचे आश्वासन दिल्याचे खैरे यांनी सांगितले आहे.