भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणींचे तात्काळ निरसन करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत ‘लोकशाही दिन’ हा एक प्रभावी उपाय म्हणून राबवला जातो. याच उपक्रमांतर्गत नागरिकांच्या तक्रारींना जलद आणि न्याय्य तोडगा मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त तसेच मंत्रालय स्तरावरही हा दिन साजरा केला जातो. आता भुसावळमध्येही याची नियमित अंमलबजावणी होणार आहे.
त्या अनुषंगाने, २१ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता तहसील कार्यालय भुसावळ येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यापुढेही दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तहसीलदार भुसावळ यांच्या दालनात हा उपक्रम नियमितपणे राबवण्यात येणार आहे.

तहसील कार्यालयाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी या दिवशी उपस्थित राहून आपल्या स्वतःच्या तक्रारींचे निवेदन सादर करावे. जेणेकरून, त्यांच्या तक्रारींचे तात्काळ निरसन करून घेता येईल. हा उपक्रम भुसावळ तालुक्यातील नागरिकांसाठी त्यांच्या समस्या थेट प्रशासनासमोर मांडण्याची आणि त्यावर त्वरित उपाय शोधण्याची एक महत्त्वाची संधी ठरणार आहे.



