Home Cities जळगाव विद्यमान एक्सप्रेस गाडीला “सविधान एक्सप्रेस” नाव देण्याची मागणी

विद्यमान एक्सप्रेस गाडीला “सविधान एक्सप्रेस” नाव देण्याची मागणी

0
189

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या सार्वभौम लोकशाही व्यवस्थेचे अधिष्ठान असलेल्या संविधानाची रचना करून देशाला शाश्वत दिशा दिली. याच ऐतिहासिक दस्तऐवजाला २६ नोव्हेंबर २०२५ रोजी ७६ वर्षे पूर्ण होत असताना, या राष्ट्रीय पर्वाचे स्मरण म्हणून भारतीय रेल्वेच्या कोणत्याही नव्या अथवा विद्यमान एक्सप्रेस गाडीला “सविधान एक्सप्रेस” हे नाव देण्यात यावे, अशी विनंती महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष उत्तमराव सपकाळे यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मा. श्रीमती स्मिताताई वाघ यांच्याकडे अधिकृत निवेदनाद्वारे मागणी केली आहे. भारतीय संविधानाची ७६ वी वर्षपूर्ती हा एक राष्ट्रीय गौरवाचा क्षण असून, देशभरातील जनतेसह आंबेडकरी समाजात याचे विशेष स्थान आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वर्षात संविधानाच्या नावाने भारतातील एखादी प्रमुख रेल्वे चालवली गेल्यास, ती एक राष्ट्रीय आदरांजली ठरेल आणि भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असेही सपकाळे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

देशात सध्या विदर्भ एक्सप्रेस, गरीब रथ, हावडा दुरांतो, संपर्क क्रांती यांसारख्या नावाने अनेक रेल्वे गाड्या धावत आहेत. त्या पार्श्वभूमीवर “सविधान एक्सप्रेस” ही गाडी भारतीय रेल्वेच्या ओळखीचा एक महत्त्वपूर्ण भाग ठरू शकते. केवळ नावापुरतीच नव्हे, तर प्रत्येक डब्यावर संविधानातील महत्त्वाचे कलम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, आणि राष्ट्रीय मूल्ये दाखवणारे संदेश असलेली ही एक चलती-जागती संविधानाची स्मृती ठरू शकते, असा विचार देखील यामागे आहे.

सपकाळे यांनी आपल्या निवेदनाच्या प्रती केंद्रीय क्रीडा मंत्री मा. रक्षाताई खडसे आणि रेल्वे मंत्री, भारत सरकार यांनाही पाठविल्या असून, या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.


Protected Content

Play sound