Home राजकीय स्वातंत्रवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी : आ. प्रसाद लाड

स्वातंत्रवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी : आ. प्रसाद लाड


मुंबई-वृत्तसेवा | विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात यावा, अशी मागणी गुरुवारी महाराष्ट्र विधानपरिषदेत करण्यात आली. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ही मागणी उपस्थित केली असून, राज्य सरकारने याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. यासंदर्भातील ठराव लवकरच सभागृहात मांडण्यात येईल, असे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानपरिषदेत त्यांच्या कार्याची आणि बलिदानाची आठवण करून देण्यात आली. यावेळी बोलताना प्रसाद लाड म्हणाले, “सावरकरांच्या हिंदुत्ववादी विचारांवर चालणारे सरकार आज राज्यात आणि केंद्रात आहे. त्यामुळे सभागृहाने एकमताने ठराव मंजूर करून तो केंद्र सरकारकडे पाठवावा आणि सावरकरांना भारतरत्न देण्याची शिफारस करावी.”

या मागणीवर उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “या संदर्भातील प्रस्ताव सभापतींकडे मांडण्यात येईल. शासनाला असा प्रस्ताव सभागृहात आणावा लागेल आणि त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.” त्यामुळे महाराष्ट्र विधिमंडळातून अधिकृत कार्यवाहीला लवकरच सुरुवात होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

सावरकरांना भारतरत्न देण्याचा मुद्दा अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. विविध संघटनांकडून आणि सावरकर समर्थकांकडून ही मागणी सातत्याने केली जात आहे. विशेष म्हणजे, २०१९ मध्ये केंद्र सरकारने संसदेत स्पष्ट केले होते की, भारतरत्न पुरस्कारासाठी कोणत्याही औपचारिक शिफारसीची तांत्रिक गरज नसते. केंद्र सरकार स्वतःहूनही हा सन्मान जाहीर करू शकते.

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही अलीकडेच सावरकरांच्या भारतरत्नबाबत भाष्य केले होते. “सावरकरांना भारतरत्न मिळाल्यास त्या पुरस्काराचेच महत्त्व अधिक वाढेल,” असे त्यांनी म्हटले होते.

गेल्या काही वर्षांपासून केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार असतानाही सावरकरांना भारतरत्न का देण्यात आला नाही, असा प्रश्न विरोधकांकडून वारंवार उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेत झालेली ही चर्चा आणि ठरावाची प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून, यामुळे सावरकरांच्या भारतरत्न पुरस्काराबाबतच्या मागणीला नवे राजकीय वजन मिळण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound