व्याजासह रक्कम परत करून पुन्हा पैश्यांची मागणी; यावल पोलीसात एकावर गुन्हा

यावल प्रतिनिधी । मुद्दलची रक्कम व्याजासह देवूनही पुन्हा पैश्यांची मागणी करत घरातील फ्रीज, टीव्ही व होम थिएटर घरातून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, गुलाब कडू मिस्त्री (वय-४६) रा. दहिगाव ता. यावल हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सुतार काम करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. घराच्या किरकोळ कामासाठी गुलाब मिस्त्री यांनी यावल शहरातील रहिवाशी सुमित युवराज घारू यांच्याकडून ५० हजार रूपये २४ जुलै २०२० रोजी उसनवारीने घेतले होते. दरम्यान गुलाब मिस्त्री यांनी वेळोवळी व्याजासह मुद्दल असा एकुण १ लाख ३५ हजार रूपये दिले. त्यानंतर पुन्हा सुमित घारू याने पैश्यांची मागणी केली. याला देण्यास नकार दिल्याने ३० नोव्हेंबर रोजी गुलाब मिस्त्री यांच्या घरातील फ्रिज, टिव्ही आणि होम थिएटर अश्या वस्तू सुमित घारू जबरदस्तीने घरातून घेवून गेला आणि  पुन्हा ५० हजार रूपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुलाब मिस्त्री यांनी बुधवार १२ जानेवारी रोजी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सुमित घारू याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे.

 

Protected Content