पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यासह पारोळा, एरंडोल, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव या तालुक्यांमध्ये परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातले असून, शेतकऱ्यांच्या कष्टाचे पीक डोळ्यादेखत वाहून गेले आहे. या पार्श्वभूमीवर स्व. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून तातडीने पंचनामे करावेत, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
या आठवड्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, बाजरी अशा पिकांची उध्वस्त स्थिती झाली आहे. नदी-नाले, प्रकल्प, धरणे तुडुंब भरून वाहत असून विसर्ग सुरू असल्याने शेतीतील उभी पीक पाण्याखाली गेले आहे.

या आपत्तीमुळे शेतकरी वर्ग हतबल झाला असून, त्यांच्यावर अस्मानी आणि सुलतानी संकटाचे सावट आले आहे. शासनाने सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर केली असली, तरी त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, असा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे करून एकरी किमान ५०,००० रुपयांचे अनुदान त्यांच्या थेट बँक खात्यात जमा करावे, अशी ठाम मागणी या वेळी करण्यात आली.
या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने पारोळा तहसीलदार उल्हास देवरे यांना निवेदन सादर करण्यात आले. या प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, तालुकाध्यक्ष प्रा. भिकनराव पाटील, छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, तसेच दत्तू पाटील, दीपक पाटील, नितीन पाटील, रवींद्र पाटील, अनिल सयाजी, धनराज पाटील, जगन्नाथ चौधरी, राहुल पाटील, मनोहर जाधव, ढल पाटील, आत्माराम पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी संघटनेच्या निवेदनात ओल्या दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, शासनाने याची तातडीने दखल घेऊन योग्य ती मदत करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांची अवस्था पाहता जिल्ह्यात ओला दुष्काळ त्वरित जाहीर होणे काळाची गरज असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित झाले आहे.



